व्यक्त झाले अबोल प्रेम!
By Admin | Updated: February 15, 2017 00:58 IST2017-02-15T00:58:14+5:302017-02-15T00:58:14+5:30
व्हॅलेंटाईन डे : तरुणाईत उत्साह; सामाजिक कार्याचीही झालर

व्यक्त झाले अबोल प्रेम!
कोल्हापूर : आपल्या अबोल प्रेमाला साद घालत मंगळवारी तरुणाईने ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या जल्लोषात साजरा केला. शहरातील राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्कसह विविध हॉटेल्समध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ची धूम दिसून आली. या दिवसाला विधायकतेची झालर देत अनेक व्यक्ती व संस्थांनी रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांसह वंचित घटकाला आनंद देण्याचा प्रयत्न केला.
दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने सुरू झालेला हा ‘डे’ सुरुवातीला सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य ठरला. आता मात्र भारतीयांकडून हा दिवस आपलासा करीत उत्साहात साजरा केला जातो.
सुरुवातीला हा दिवस तरुणांत केवळ ‘प्रपोज’ करण्यासाठीच साजरा केला जायचा. आता ही चौकट मोडून प्रेमाच्या अर्थाची परिभाषा बदलली आहे. आई-वडील, पती-पत्नी, भावा-बहिणीचे प्रेम, महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींचा कट्टा, ज्येष्ठांचा मायेचा हात या प्रेमाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करीत हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त मंगळवारी सकाळपासून सर्व महाविद्यालयांवर तरुणाईची गर्दी होती. खास वेशभूषा करून युवक-युवती महाविद्यालयात हजर होते. काही हॉटेल्स्, रेस्टॉरंट सजविण्यात आली होती. शुभेच्छापत्र, गिफ्टची देवाण-घेवाण होत होती.
पोलिसांची कारवाई
‘व्हॅलेंटाईन डे’ला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली होती. संवेदनशील असलेल्या महत्त्वाच्या महाविद्यालयांवर पोलिसांचा पहारा होता. पोलिस महाविद्यालयाच्या बाहेर कोणालाही थांबू देत नव्हते. मुलांना घोळका करून थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता शिवाय महाविद्यालयाचे वॉचमन जातीने परिसरात उपस्थित राहून कुठे अनुचित प्रकार घडत नाही, याकडे लक्ष देत होते. सामाजिकतेची झालर
या दिवसाला सामाजिकतेची झालर देत कृती समिती संयुक्त न्यू शाहूपुरी या संस्थेच्यावतीने ताराबाई गार्डन येथे रक्तदान शिबिर झाले. अध्यक्ष संजय घाटगे-वंदूरकर व ए. बी. फौंडेशनचे संचालक प्रदीप अतिग्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. तसेच सार्थक क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी शिये येथील करूणालय मुलांसोबत दिवस घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविले.