‘सेफ सिटी’च्या त्रुटी उघड
By Admin | Updated: July 2, 2016 00:37 IST2016-07-02T00:28:05+5:302016-07-02T00:37:35+5:30
‘स्थायी’ सदस्यांची पाहणी : कॅमेऱ्यातील चित्रे अस्पष्ट

‘सेफ सिटी’च्या त्रुटी उघड
कोल्हापूर : तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या सेफ सिटी प्रकल्पाच्या कामाची शुक्रवारी महानगरपालिका स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह काही सदस्यांनी पाहणी केली. यावेळी अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे अनेक कॅमेरातून घेतलेली चित्रे अस्पष्ट दिसत असल्याचे सभापती जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महानगरपालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी दुपारी सभापती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहरात राबविण्यात आलेल्या सेफ सिटी प्रकल्पातील कामाच्या चुकांबाबत जोरदार चर्चा झाली. सदस्यांच्या आग्रहाखातर या प्रकल्पाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे कामकाज संपवून या प्रकल्पाची सभापतींसह सदस्यांनी पाहणी केली.
राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, नगरसेविका दीपा मगदूम, रिना कांबळे, जयश्री चव्हाण, सूरमंजिरी लाटकर, शोभा बोंद्रे, रूपाराणी निकम, मनिषा कुंभार आदींनी ही पाहणी केली. त्यांना पोलिस निरीक्षक भांबुरे यांनी माहिती दिली.
शहरात बहुतांशी चौकात कॅमरे सिग्नलवर बसविण्यात आले आले आहेत. वास्तविक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे ते रस्त्याच्या मध्यभागी बसविणे आवश्यक होते. ३६० अंशातील छायाचित्रे टिपणारा कॅमेराही रस्त्याच्या एका बाजूला बसविल्यामुळे ते केवळ १८० अंशातच चित्रे टिपतो. त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत ही बाब यावेळी उघडकीस आली आहे. काही कॅमेऱ्यांनी टिपलेली छायाचित्रे झूम करून पाहिल्यावर व्यक्तींचे चेहरे फाटलेले दिसतात. वाहनांचे क्रमांक अस्पष्ट दिसतात, असे सभापती जाधव यांनी सांगितले.
सेफ सिटी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात बसविण्यात आलेल्या साध्या टीव्ही स्क्रीनच्याऐवजी एलईडी
स्क्रीन बसविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. काही मोजके कॅमेरे
पूर्ण क्षमतेने काम करतात हे दिसून आले, असेही जाधव यांनी सांगितले. शुक्रवारी पदाधिकारी व नगरसेवकांनी केलेल्या पाहणीवेळी महत्त्वाच्या
त्रुटी समोर आल्यामुळे हा प्रकल्प आणखीन गोत्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पाहणीत या गोष्टी आढळल्या...
वास्तविक पोलिसांच्या सूचनेप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागी कॅमेरे बसविणे आवश्यक होते
३६० अंशातील छायाचित्रे टिपणारा कॅमेराही रस्त्याच्या एका बाजूला बसविल्यामुळे तो केवळ १८० अंशातच चित्रे टिपतो.
काही कॅमेऱ्यांनी टिपलेली छायाचित्रे झूम करून पाहिल्यावर व्यक्तींचे चेहरे फाटलेले दिसतात
सेफ सिटी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षात बसविण्यात आलेल्या साध्या टीव्ही स्क्रीनच्याऐवजी एलईडी स्क्रीन बसविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.