ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच
By Admin | Updated: November 21, 2015 00:15 IST2015-11-20T20:47:45+5:302015-11-21T00:15:52+5:30
टनाला ५0 ते १०० रूपयांचा फटका : प्रत्येक गाडी, ट्रॅक्टरमागे खुशालीची मागणी

ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच
चंद्रकांत पाटील-- गगनबावडा : गेल्या काही वर्षापासून ऊसतोडणी मजुरांना प्रत्येक गाडीमागे पैसे देण्याचा एक नवीनच पायंडा पडला आहे. लाच घेतल्याशिवाय ते फडाला हात लावत नाहीत. हे कारखान्याला माहीत असूनही ते संबंधितांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या मजुरांचे फावले आहे. लाच दिल्याने शेतकऱ्यांना सरासरी टनाला ५० ते १०० रूपयांचा फटाक बसतो.
गळीत हंगाम सुरू झाला की सुरूवातीचे काही दिवस पैस न घेता मजुर तोडणी करतात नंतर मात्र ट्रक व ट्रॅक्टरला ५०० ते १००० रू असा लाचेचा दर पाडतात. शेतकरी ऊसाला तोडणी आल्यावर पैसे देण्यास नकार देवू लागला तर सरळ ऊस न तोडण्याची धमकी देतात. त्यामुळे हाता पाया पडून आणलेली तोडणी परत जाऊ नये म्हणून शेतकरी नाईलाजास्तव पैसे द्यायला तयार होतात. काही मोठ्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास जरी परवडत असले तरी लहान शेतकऱ्यांना म्हणजे दहा गुंठे, अर्धा एकर किंवा एकरभर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पैसे देणे परवडत नाही.
तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई म्हणून कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटनेने जाब विचारावा, अशी मागणी होत आहे. तसेच कारखान्यानेही याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी होत आहे. +
रस्सामंडळ गेले : अॅडव्हान्स आला
यापूर्वी ऊसाला तोड येते तेंव्हा शेतकरी ऊसतोडणी मजुरांना सकाळच्या वेळेत चहा-वरकी, बटर द्यायचा. ऊसाचा फड संपल्यावर खुशीने एखादा प्रोग्राम (रस्सामंडळ) द्यायचा. मजूर या चहा व रस्सामंडळावर खुश असायचे.
पण आता पूर्ण परिस्थीती बदलली आहे. पैसे दिल्याशिवाय ऊस तोडला जात नाही. पैसे आगाऊ (अॅडव्हान्स) मध्ये घेतले जातात. कारखान्याकडे याबाबत तक्रार केल्यास फडकरी किती पैसे मागतोय ते मुकाटपणे दे जा आणि ऊस तोडणी घेजा, असा सल्ला मुकादम देत असल्याने शेतकरी गप्प बसतो.
त्यातच तोडणी आल्यावर फडकरी ऊसाच वाडे ऊसाचे वाडे शेतकऱ्याला (ऊस मालकाला) देत नाहीत. वाडे विकून बक्कल पैसा कमवतात. म्हणजेच शेतमजुरांना ऊसतोडणीची मजूरी, ऊसाचे वाडे विकून व उसतोडणीसाठी लाच घेऊन असा तिहेरी लाभ मिळतो.