दखल घ्यावी असा प्रयोग-

By Admin | Updated: November 30, 2015 01:06 IST2015-11-30T00:43:51+5:302015-11-30T01:06:53+5:30

-राज्य नाट्य स्पर्धा

Experimenting | दखल घ्यावी असा प्रयोग-

दखल घ्यावी असा प्रयोग-


नाटकाची निवड हा स्पर्धेतच नव्हे, तर एरव्ही व्यावसायिक, अव्यावसायिक कोणत्याही निमित्ताने सादर करावयाच्या प्रयोगासाठी महत्त्वाची बाब ठरते. निदान नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यास योग्य असावे, ही प्रेक्षकांची निसंयोजकांची पण अपेक्षा असते. स्पर्धेच्या या प्रयोगशाळेत रंगभूमी ह्या माध्यमाच्या विविध शक्यता तपासून पाहण्याची एक संधी असते नि त्याची सुरुवात नाटकाच्या निवडीपासून होते. स्पर्धेच्या नियमांनुसार मिळणाऱ्या पाच गुणांची काळजी न करता जुने नाटक निवडले / उरलेल्या ५५ गुणांपैकी जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा हक्क दिग्दर्शक नि संस्थेला असतोच. नवे नाटक म्हणून पाच गुण विनासायास मिळविणाऱ्या संस्था स्पर्धात्मक यश मिळवितातच असे नाही.
ऐंशी-नव्वदच्या दशकात धंदेवाईक नाटकांचे पेव फुटले होते तेव्हाचे हे नाटक. जसे ते पेव आज काल टी.व्ही. मालिकांच्या बाबतीत फुटले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियांचा बकासूर नि त्याची भूक अमर्याद आहे. टी.व्ही.चा स्वीच आॅन केल्यावर कुणी ना कुणी टाईमपास करायला बडबडतंय अगर नाचतंय, एवढीच अपेक्षा टी. व्ही. पाहणाऱ्यांची असते. संयोजकांचे घोळ न संपणारे असले तरी रंगभूमी ह्या प्रचंड ताकदीच्या माध्यमाचे भान ठेवून प्रेक्षकांच्या केवळ करमणूक या तत्कालिक गरजेसाठी फरफटत न जाता रंगभूमीवर अर्थपूर्ण प्रयोग करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची संख्या आजही लक्षणीय आहे आणि म्हणूनच राज्य नाट्य स्पर्धा अस्तित्वात आहेत.
गेली अनेक वर्षे रंगभूमीशी निगडित असलेल्या दिग्दर्शक राजेंद्र बांबूळकर यांनी रूद्राक्ष अकॅडमी संस्थेतर्फे सादर केलेले प्र. ल. बयेकरलिखित ‘डॅडी आय लव्ह यू’ हे नाटक पाहिल्यानंतर त्यांच्या या बहुतेक पहिल्या प्रयत्नांबद्दल जे विचार मनात आले ते असे. कलाकारांची आणि तांत्रिक साथ असताना होती गरज ती फक्त सुयोग्य रचनेची. जी दिग्दर्शकाने गंभीरपणे लक्षात घेऊन स्वीकारलेल्या बऱ्या-वाईट नाटकाला न्याय द्यायला हवा होता. दिग्दर्शन आणि अभिनय करता-करता होणारी दमछाक पण टाळता येणे शक्य होते. त्यामुळे ‘आदिनाथ’ किंवा ‘दीनानाथ’ यांच्या दिसण्यातले साम्यवगळता त्या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. या लेखकाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा लागला नसता. मुळात नाटकाच्या नि लॉ अँड आॅर्डरचा नाटकात इन्स्पेक्टर आहे म्हणून संबंध आहे, म्हणावे लागते. सर्व प्रकारच्या योगायोगांनी ठसाठस भरलेले हे नाटक टी.व्ही. सिरीयलसारखेच तद्दन टाईमपास नाटक आहे; पण दिग्दर्शकाबरोबर समर्थ अभिनयाचे सुप्त गुण असलेल्या कलाकारांची झालेली फरफट आणि प्रयोग सादर करण्याची जिद्द पुढच्या प्रवासात एक अनुभव म्हणून उपयोगाला यावी.
प्रयोगाबद्दल दिग्दर्शक, तंत्रज्ञांनी दिलेले लेखी म्हणणे आणि प्रत्यक्ष प्रयोग याचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे असे काही नसते. त्यामुळे बांबूळकरनी अशा म्हणण्याचा दिलेला गठ्ठा, प्रयोग सुविहित करण्यास किती उपयोगाचा ठरला, याचे आत्मपरीक्षण केल्यास त्यांच्या लक्षात येईल. नाटकाचा, त्यातून स्पर्धेतील नाटकांचा प्रेक्षक हा सहिष्णूच असतो. जे काही समोर दिलेले आहे ते विना तक्रार स्वीकारतो. या संधीचा फायदा या नाटकाला मिळालाच आहे. गरज आहे ती भविष्यात चांगले प्रयोग करून याच प्रेक्षकांना एक विरळा अनुभव देण्याची. ती क्षमता या ग्रुपमध्ये निर्विवाद आहे. पण...!
प्रसन्न जी. कुलकर्णी

Web Title: Experimenting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.