कोल्हापुरात दिवसभर तीन ऋतूंचा अनुभव
By Admin | Updated: May 15, 2015 00:03 IST2015-05-14T21:59:30+5:302015-05-15T00:03:34+5:30
ढगाळ वातावरण : पावसाचा शिडकावा; पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता

कोल्हापुरात दिवसभर तीन ऋतूंचा अनुभव
कोल्हापूर : पहाटे बोचरी थंडी, बारा वाजता पाऊस आणि दुपारनंतर प्र्रचंड उष्णता अशाप्रकारे गुरुवारी दिवसभर हिवाळा, पावसाळा, उन्हाळा अशा तीन ऋतूंचा अनुभव आला. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी राहिली. हवामान ढगाळ राहिले. सायंकाळपर्यंत कोणत्याही क्षणी मोठा पाऊस सुरू होईल, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, वळवाने चकवा दिला.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात वळीव पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी पहाटेपासूनच आकाशात ढग दाटून आले. पहाटे हवेत कमालीचा गारवा होता. अंगात हुडहुडी भरणारी थंडी जाणवत होती. बारा वाजता काहीवेळ पावसाचा शिडकावा झाला. दुपारी दोननंतर हवेत उष्णता प्रचंड वाढली. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तडाखा बसला तरी उष्णतेने अंगाची लाहीलाही झाली. कार्यालयांत गारव्यासाठी पंख्यांची गरगर सुरू राहिली. मेच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळी आणि ढगाळ वातावरण राहिल्यामुळे नेमका हंगाम कोणता सुरू आहे, यासंबंधी काहीकाळ प्रत्येकाच्या मनात प्रश्न उपस्थित होत राहिला. अनेकजणांनी पावसाळ्याचे वातावरण आहे आणि दुपारची उष्णता उन्हाळ्यातील आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ढगाळ वातावरणामुळे काहीजण अंगदुखीने हैराण झाले. (प्रतिनिधी)
पडणारा पाऊस ऊसपिकाला आणि खरीपपूर्व मशागतीला अतिशय पोषक ठरत आहे. मात्र, गेल्या चार दिवसांत पाऊस जोरदार पडल्याने जमिनीत ओल तयार झाली आहे. वापसा नसल्याने मशागतीची कामे ठप्प आहेत. पुढील आठवड्यात भातपिकाची पेरणी सुरू होईल.
- मोहन आटोळे, कृषी अधीक्षक
रुग्णालयांत गर्दी
हवामानात मोठा बदल झाला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे. ढगाळ वातावरणामुळे अंगदुखी, तर वळीव पावसात भिजल्यानंतर सर्दी, ताप असे आजार होत आहेत.
त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी होत आहे. त्यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश अधिक आहे.