‘महाराष्ट्र केसरी’साठी कागलकरांच्या अपेक्षा
By Admin | Updated: December 19, 2014 00:20 IST2014-12-18T22:01:31+5:302014-12-19T00:20:42+5:30
तालुक्यातील दोन मल्ल ठरले पात्र

‘महाराष्ट्र केसरी’साठी कागलकरांच्या अपेक्षा
म्हाकवे : अहमदनगर येथे होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील चारपैकी दोन मल्ल हे कागल तालुक्यातील आहेत. त्यामुळे शाहूकाळापासून कुस्ती पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कागलकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पिंपळगाव बुद्रुक येथील कौतुक शामराव डाफळे व रणदिवेवाडी येथील महेश वरुटे या मल्लांचा समावेश आहे. पिंपळगाव बुद्रुकसारख्या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कौतुकने २०१० ते १२ यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली होती.
तसेच रेल्वेच्यावतीने दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया रेल्वे कुस्ती स्पर्धेत त्याने रौप्यपदक, आंतरभारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत कांस्य व रौप्यपदक पटकावले होते. तसेच विविध कुस्ती मैदानांमध्ये हरियाणा, दिल्ली येथील मल्लांना अस्मान दाखवून कौतुकने आपली चमक दाखविली आहे.
सध्या तो अर्जुन अवॉर्ड विजेते काका पवार, सेना केसरी गुंडाजी पाटील, वस्ताद तुकाराम चोपडे, उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील, आदींच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करीत आहेत. त्याला ‘शाहू’ कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे, जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे सहकार्य लाभले आहे.
महेश वरुटे रणदिवेवाडी या खेड्यातला. त्यानेही राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळविली आहेत. सध्या तो ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांच्याकडून कुस्तीेचे धडे घेत आहे. कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत महेश सराव करतो. (वार्ताहर)