भाजप सरकारकडून क्रीडासंकुलाची अपेक्षा
By Admin | Updated: November 7, 2014 23:33 IST2014-11-07T23:19:53+5:302014-11-07T23:33:28+5:30
मार्चपासून रखडले काम : विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत २० रोजी बैठक

भाजप सरकारकडून क्रीडासंकुलाची अपेक्षा
सचिन भोसले -- कोल्हापूर -गेली सात महिने या ना त्या कारणांनी विभागीय क्रीडासंकुलाचे काम पूर्ण ठप्प आहे. प्रथम तांत्रिक अडचणी आणि सुधारित अंदाजपत्रकामुळे ठेकेदाराने वाढलेल्या बांधकाम साहित्याच्या दरामुळे काम करण्यास दाखविलेली असमर्थता यांसह एकूणच अनास्थेच्या कारभाराच्या कारणावरून दोन वर्षांपासून क्रीडासंकुलाचे काम रेंगाळले आहे. आता नव्या भाजप सरकारने तरी देशाचे भावी खेळाडू घडविणाऱ्या क्रीडासंकुलाला निधीचा बुस्टर द्यावा, अशी अपेक्षा कोल्हापूरवासीयांकडून व्यक्त होत आहे. संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील खो-खो, कबड्डी, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल मैदानाचे काम पूर्ण झाले आहे. फुटबॉल मैदान, अंतर्गत रस्ते, ४०० मीटर धावणे मार्ग, टेनिस कोर्ट, अंतर्गत रस्ते आणि पाणीव्यवस्था, संरक्षक भिंतीचे काम पन्नास टक्केच झाले आहे. थकलेले बिल आणि भाववाढीच्या मुद्द्यांवरून मार्च २०१४ पासून संकुलाचे काम ठेकेदाराने थांबविले आहे.
विभागीय क्रीडासंकुलासाठी २९ कोटींचा प्रस्ताव होता; पण संकुलातील कामांत काही अतिरिक्त बाबींचा समावेश केल्याने एकूण खर्च ३६ कोटी ८२ लाखांपर्यंत होणार आहे. त्याबाबतच्या सुधारित अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आहे. विभागीय संकुल समितीने राज्य क्रीडा विकास समितीला आॅगस्टमध्ये हे अंदाजपत्रक सादर केले. या समितीने त्यात त्रुटी दाखविल्या. त्यांची पूर्तता करून पुन्हा हे अंदाजपत्रक सप्टेंबरमध्ये संबंधित समितीकडे पाठविले. दि. १९ मार्चला त्याला राज्य क्रीडा विकास समितीने मंजुरी दिली. त्यामुळे आता निधीचा प्रश्न मिटला, असे वाटू लागले. मात्र, निधीचा प्रश्न नसला, तरी भाववाढीचा मुद्दा ऐरणीवर आला. पुढे लोकसभा निवडणुका आचारसंहिता आणि त्यानंतर पावसाळा आला. पुढे तर विधानसभा निवडणुकाही झाल्या. तरीही या संकुलाचे काम पूर्णत्वाकडे गेलेच नाही. आता याबाबत विभागीय आयुक्तांबरोबर क्रीडा उपसंचालकांची याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीतच संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे की नाही, हे कळेलच.
असा लागला कामाला ब्रेक
संभाजीनगर येथील रेसकोर्स परिसरातील १६ एकर जागेत नोव्हेंबर २००९ मध्ये क्रीडासंकुलाचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी खर्च केला. त्यात झालेली शूटिंग रेंज, लॉन टेनिस यांमधील काही अतिरिक्त कामे, जलतरण तलावामध्ये येणारे सांडपाण्याचे उमाळे, अशा त्रुटी बांधकामात राहिल्या. पैसे न मिळाल्याने त्याने आठ महिने काम थांबविले. बांधकामातील त्रृटी आणि निधीच्या कमतरतेमुळे मे २०१३ पर्यंत काम रखडले. त्यावर शिवसेनेने आंदोलन केले. २० जूनला विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कोल्हापुरात बैठक घेतली. त्यात संकुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर २०१३ पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ दिली. शिवाय त्याची थकबाकी अदा केली. त्यानंतर पावसामुळे काम पुन्हा थांबले आणि ते दि. १५ नोव्हेंबरपासून काम पूर्ववत सुरू झाले आणि भाववाढीच्या मुद्द्यावरून पुन्हा मार्च २०१४ पासून आजतागायत ७ नोव्हेंबरअखेर या ना त्या कारणाने हे काम अपूर्णच आहे.
क्रीडासंकुल हे कोल्हापूरचे वैभव आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यासाठी हे क्रीडासंकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे नव्या भाजप सरकारने तरी यासाठी निधी उपलब्ध करून देऊन बांधकाम पूर्ण करावे.
- अरुण नरके
माजी फुटबॉलपटू व क्रीडा संघटक
कोल्हापूरचे वैभव असणारे हे विभागीय क्रीडासंकुल नव्या सरकारने तरी प्राधान्यक्रमाने पूर्ण करावे. आपल्या मुलांना पुणे-मुंबईची वाट धरायला लावू नये. ही मुले आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण कोल्हापुरातच घेतील.
- लालासाहेब गायकवाड
क्रीडा संघटक
पुणे विभागीय आयुक्तांबरोबर येत्या २० नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत संकुलाच्या संपूर्ण कामाचा अहवाल ठेवला जाणार आहे. यामध्ये किती काम निकषाप्रमाणे झाले आहे किंवा झालेले नाही. त्याप्रमाणे पुढील कामास सुरुवात करायची की नाही, हे ठरणार आाहे.
- बी. एन. मोटे
क्रीडा उपसंचालक
कामाची आजची स्थिती अशी...
संकुलाच्या १७ कोटींच्या कामांपैकी १३ कोटींची कामे पूर्ण
आजअखेर एकूण ७० टक्के कामाची पूर्तता
संरक्षक भिंतीचे काम ९५ टक्के पूर्ण
फुटबॉल मैदानातील वीट व अंतिम थराचे काम अपूर्ण
शूटिंग रेंजचा अंतर्गत गिलावा, रंगकाम बाकी
विद्युतीकरणाची ७० टक्केकामे पूर्ण
टेनिसचे दोन कोर्ट पूर्ण, तिसऱ्या कोर्टच्या सिंथेटिक लेअरचे काम पूर्णत्वाकडे
अंतर्गत पाणी व्यवस्था, रस्त्यांचे २० ते २५ टक्के काम बाकी
जलतरण तलाव, डायव्हिंग पुलाचे ६० टक्के काम पूर्ण
४०० मीटर धावणे मार्गाच्या अंतिम थराचे काम बाकी