‘राजाराम’च्या विस्तारीकरण, सहवीज प्रकल्पाचा घाट कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:26+5:302021-02-09T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रचंड कर्ज असताना पुन्हा नवीन विस्तारीकरण व ...

‘राजाराम’च्या विस्तारीकरण, सहवीज प्रकल्पाचा घाट कशासाठी ?
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रचंड कर्ज असताना पुन्हा नवीन विस्तारीकरण व सहवीज प्रकल्पासाठी १०० ते १५० कोटी रुपये खर्च करून कारखान्याला कर्जाच्या खाईत घालण्याचा सत्तारूढ आघाडीच्या डाव परिवर्तन आघाडी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे पत्रक माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
नुकत्याच राजाराम कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजाराम कारखान्यात १८.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारण्याचा व कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन साडेतीन हजारांवरून पाच हजार करण्यासाठी विस्तारीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. मुळातच सध्या कारखान्याची गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टन असताना प्रत्यक्षात आजपर्यंत कधीही या पूर्ण क्षमतेने कारखान्याचे गाळप होऊ शकलेले नाही. असे असताना पुन्हा गाळप क्षमता वाढविण्याचे कारण काय? तसेच सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज खरेदीच्या दराबाबत कोणते धोरण शासनाने अद्याप निश्चित केलेले नाही. असे असताना सहवीज प्रकल्प राबविण्याचा अट्टहास कशासाठी, याचा खुलासा कारखान्याने करावा, अशी मागणीही सालपे यांनी पत्रकात केली आहे.
सध्या होऊ घातलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीची सत्ता जाणार याची त्यांना खात्री झाल्याने जाता-जाता कारखान्यावर विस्तारीकरण व सहवीज प्रकल्पाच्या माध्यमातून १५० कोटींचा डोंगर उभा करण्याचे धोरण असल्याचे दिसून येते; पण आम्ही तो डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही सालपे यांनी पत्रकात नमूद केले आहे.