प्रचाराच्या ‘रणा’त दिग्गजांच्या फैरी

By Admin | Updated: October 15, 2015 00:49 IST2015-10-15T00:21:37+5:302015-10-15T00:49:51+5:30

महापालिका निवडणूक : आजी-माजी मुख्यमंत्री, डझनभर मंत्री येणार; शिवसेना-भाजप करणार रोड शो

Expansion of the legends in the campaign "Rani" | प्रचाराच्या ‘रणा’त दिग्गजांच्या फैरी

प्रचाराच्या ‘रणा’त दिग्गजांच्या फैरी

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह राज्यातील आठ ते दहा मंत्री, कॉँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री कोल्हापुरात येत आहेत. येत्या मंगळवार (दि. २०) पासून या राजकीय नेत्यांचे दौरे निश्चित असून, प्रचाराच्या सभांतून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार, हे स्पष्ट आहे. महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजप-ताराराणी, शिवसेना, आदी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, सर्वांनी आपापल्या पद्धतीने त्याचे नियोजन केले आहे.राष्ट्रवादीचा प्रारंभ मंगळवारपासूनपवार, भुजबळ, तटकरे येणार राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने निवडणुकीची एकहाती यंत्रणा माजी मंत्री हसन मुश्रीफ हाताळत आहेत. सक्षम उमेदवार निश्चित करण्यापासून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी (दि. २०) होत आहे. या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मुुुलूखमैदान तोफा प्रचारादरम्यान धडाडणार आहेत. जयंत पाटील हे तर कोल्हापुरात आठ दिवस तळ ठोकून राहणार आहेत. हसन मुश्रीफ यांच्या सभा व प्रचारफेऱ्यांचे स्वतंत्र नियोजन केले आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस यावेळी वाहनांवर बसविलेल्या मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ चित्रफितीद्वारे प्रचार करणार आहे. भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनी पूर्वी विरोधी पक्षात असताना कोल्हापूरकरांना दिलेली आश्वासने आणि आता त्यांची बदललेली भूमिका अशा तुलनात्मक चित्रफिती राष्ट्रवादी पक्ष संपूर्ण शहरभर दाखविणार आहे. प्रचारात पथनाट्यांचाही अवलंब केला जाणार आहे. प्रचार पदयात्रा प्रत्येक प्रभागात काढल्या जाणार आहेत. तीन माजी मुख्यमंत्री करणार कॉँग्रेसचा प्रचार
कॉँग्रेसतर्फे पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे हे तीन माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. या तीन नेत्यांच्या वेगवेगळ्या दिवशी स्वतंत्र सभांचे आयोजन केले आहे. त्यांचा कोल्हापूर दौरा नक्की झाला असला, तरी दौऱ्याच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत. तीन प्रमुख नेत्यांसह चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, माजी मंत्री सतेज पाटील विविध सभांतून जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. कॉँग्रेस पक्षाने रोड शो करण्यास फाटा दिला आहे.
उद्धव ठाकरेंची सभा, तर आदित्य करणार रोड शो
शिवसेना पक्षनेतृत्वाने महापालिका निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला आहे. उमेदवार निश्चित करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता दि. २४ ते २७ आॅक्टोबरदरम्यान पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहनिर्माणमंत्री रवींद्र वायकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आमदार नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, शिवचरित्राचे व्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या सभांचे आयोजन केले आहे. प्रत्येक मंत्र्यांना एकाच दिवसात तीन ते चार सभा देण्यात येणार आहेत. २५ आॅक्टोबरला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात रोड शो होणार आहे; तर २८ आॅक्टोबरला पेटाळा मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेने प्रचाराची सांगता होईल.


मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे चार मंत्री येणार
भारतीय जनता पक्षाची निवडणूक यंत्रणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांभाळत आहेत. ते स्वत: शहराच्या अनेक प्रभागांत जाऊन पदयात्रा, प्रचारसभांतून भाग घेणार आहेत. त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ किंवा २९ आॅक्टोबरला कोल्हापुरात येणार असून, जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत. स्टार प्रचारक म्हणून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे प्रचारसभांतून बोलणार आहेत. याशिवाय पक्षाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान दोन सेलिब्रेटींच्या रोड शोचे आयोजन केले आहे. प्रचारात पथनाट्येही सादर केली जाणार आहेत. पक्षाने संपूर्ण शहरात प्रचार करण्याकरिता दहा वाहने भाड्याने घेतली असून, त्यांवर व्हिडीओ चित्रफिती ऐकविल्या जाणार आहेत.

Web Title: Expansion of the legends in the campaign "Rani"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.