हमिदवाडयातील ‘त्या’ निष्ठावंत कार्यकर्त्याची एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:45+5:302021-09-14T04:28:45+5:30

कागल तालुक्यात राजकीय गटा-तटाच्या अस्तित्वाच्या लढाईतही भाजप पक्ष वाढविण्यासाठी तब्बल तीन दशके प्रयत्नशील राहिलेले हमिदवाडा (ता. कागल) येथील ...

Exit of 'that' loyal worker from Hamidwada | हमिदवाडयातील ‘त्या’ निष्ठावंत कार्यकर्त्याची एक्झिट

हमिदवाडयातील ‘त्या’ निष्ठावंत कार्यकर्त्याची एक्झिट

कागल तालुक्यात राजकीय गटा-तटाच्या अस्तित्वाच्या लढाईतही भाजप पक्ष वाढविण्यासाठी तब्बल तीन दशके प्रयत्नशील राहिलेले हमिदवाडा (ता. कागल) येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस आनंदा दत्तात्रय मांगले (वय ४५) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

सातत्याने महागाई, रेशन, विविध विकास कामांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरून गोरगरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी ते नेहमी कार्यतत्पर राहात होते. दिलदारवृत्ती आणि मनमिळावू स्वभाव असणाऱ्या मांगले यांची एक्झिट गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना चटका लावणारी ठरली.

गत जि. प. च्या निवडणुकीत नानीबाई चिखली मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती; तर अनेकवेळा त्यांनी विधानसभा, पं. स. निवडणुकांसाठीही अर्ज सादर केले होते. यामध्ये त्यांना यश मिळाले नसले, तरी भाजपचे अस्तित्व कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले. अनेक वर्षांपासून ते परिसरात घरोघरी जाऊन चहा-पावडरचा व्यवसाय करत होते; तर गत दोन वर्षांत शेती सेवा दुकान सुरू केले होते. विश्वासार्हता जपल्यामुळे भाजपच्या वरिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये मांगले यांची वर्णी होती. त्यांच्या निधनाबाबत भाजपसह शिवसेनेच्या वरिष्ठ नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Exit of 'that' loyal worker from Hamidwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.