आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या चित्रप्रतींचे उद्यापासून प्रदर्शन
By Admin | Updated: November 14, 2014 23:57 IST2014-11-14T23:54:43+5:302014-11-14T23:57:21+5:30
कोल्हापूरकरांना पर्वणी : पुण्यातील ‘ड्रीम अ पेंटिंग’ या संस्थेचा उपक्रम

आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या चित्रप्रतींचे उद्यापासून प्रदर्शन
कोल्हापूर : पुण्यातील ‘ड्रीम अ पेंटिंग’ या संस्थेतर्फे रविवार (दि. १६) पासून जगभरात गाजलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकारांच्या दुर्मीळ चित्रप्रतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अमोद भट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, शाहू स्मारक भवनच्या कलादालनात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते होईल. या प्रदर्शनात व्हॅनगॉग, क्लॉद मोने, लिओ नार्दोे दि विंची, पिसारो, देगास आणि क्लीसारख्या जगप्रसिद्ध चित्रकारांची इतिहास-पूर्व गुंफाचित्रे, स्थिरवस्तू चित्रण, विख्यात चित्रकारांची उत्तम निसर्गचित्रे आणि समुद्रचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
दुर्मीळ चित्रांच्या हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिकृती, पूर्वपरवानगीनुसार मूळ चित्रातील सर्व वैशिष्ट्य जसे स्ट्रोक्स, रेषा, रंगसंगती आणि हावभाव कुठेही न बदलता, कॅनव्हासवर डच तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्राद्वारे छापल्या आहेत. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेपैकी १५ टक्के निधी हा बालकल्याण संकुल संस्थेला देण्यात येणार आहे. तरी रसिकांनी रविवारपासून २१ नोव्हेंबरपर्यंत सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू राहणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस जी. एस. माजगावकर उपस्थित होते.
प्रदर्शनांतर्गत उदयोन्मुख चित्रकारांसाठी गुरुवारी (दि. २०) ‘द करंट युरोपियन आर्ट मार्केट अँड हाऊ टू गेट इन’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात ब्रिटिश कलाकारांच्या उन्नतीसाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या आणि क्युरेटर असणाऱ्या कॅथरिना या कोल्हापुरातील चित्रकारांना आपली कला युरोपातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यासाठी लागणाऱ्या कार्यप्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.