थकीत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:33+5:302021-02-05T07:01:33+5:30
जयसिंगपूर : महा डीबीटी अंतर्गत थकीत असलेली शिष्यवृत्ती १० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती समाजकल्याण पुणे ...

थकीत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार
जयसिंगपूर : महा डीबीटी अंतर्गत थकीत असलेली शिष्यवृत्ती १० फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती समाजकल्याण पुणे विभागीय उपायुक्त भारत केंद्रे यांनी दिली असल्याचे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे यांनी सांगितले.
हिप्परगे म्हणाले, सन २०१८ पासून पुणे विभागाकडून महा डीबीटी अंतर्गत विद्यार्थ्यांची २३ कोटी रुपये थकीत आहेत. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे, कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांच्याकडेही पाठपुरावा केलेला होता. स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडेही मागणी केली होती. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट चाललेली आहे. ओबीसी, व्ही. जे. एन. टी. एसबीसी, आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा जास्त फटका बसलेला होता.
सौरभ शेट्टी म्हणाले, या शिष्यवृत्तीचा लाभ पुणे विभागातील पुणेसह सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशासनाने १० फेब्रुवारीच्या आत विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करावी, अन्यथा विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरेल, असा इशाराही यावेळी दिला.