माजी सैनिकाकडून कोटीचा गंडा
By Admin | Updated: July 3, 2014 01:13 IST2014-07-03T01:07:53+5:302014-07-03T01:13:53+5:30
सैन्य भरतीचे आमिष : कोल्हापुरात अटक; युवकांची फसवणूक

माजी सैनिकाकडून कोटीचा गंडा
कोल्हापूर : गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना सैन्यभरतीचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा घालणाऱ्या माजी सैनिकाच्या मुसक्या आज, बुधवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. संशयित भामटा संदीप बळवंत गुरव (वय ३०, रा. आपटेनगर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, संदीप गुरव हा मूळचा भाटिवडे (ता. भुदरगड); परंतु तो सध्या आपटेनगरमध्ये प्लॉट नंबर १३, संस्कार बंगला, शांती उद्यानशेजारी राहत होता. त्याने सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण सैन्यात अधिकारी असल्याच्या भूलथापा मारून दुष्काळग्रस्त कवठेमहांकाळ तालुक्यातील ४० ते ५० सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सैन्यभरतीचे आमिष दाखवून सुमारे एक कोटीचा गंडा घालून पसार झाला होता. फसवणूक झालेल्या तरुणांनी पुणे आयुक्तालयातील खडकी पोलीस ठाण्यात गुरव यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन घटनेबाबतचा सर्व वृत्तांत कथन केला. पुणे आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्ह्यातील संशयित भामटा हा कोल्हापूर येथील रहिवासी असल्याने त्यांनी तपासासाठी सहकार्य करण्यासाठी काल, मंगळवारी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधला. (पान १ वरून) देशमुख यांनी तातडीने शोधमोहीम राबविली. आपल्या टीममधील दोन पथके गुरव राहत असलेल्या आपटेनगर व भाटिवडे येथे पाठविली. परंतु आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो तेथून पसार झाला होता. आपले अस्तित्व लपविण्याच्या उद्देशाने तो पोलिसांना चकवा देत लपून बसला होता. त्यानंतर देशमुख यांनी त्याचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळविले तसेच खबऱ्यांद्वारे माहिती घेतली असता त्याचे वास्तव्य आमरोळी (ता. चंदगड) येथे असल्याचे समजले. त्यानुसार त्या परिसरात पाळत ठेवून त्याला अटक केली.
आरोपीस पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासमोर हजर करून त्याला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले. (प्रतिनिधी)
गृहमंत्र्यांकडून दखल
फसवणूक झालेल्या युवकांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन संदीप गुरव याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेची गृहमंत्री पाटील यांनी तत्काळ दखल घेत पुणे आयुक्तालयास चौकशी करून आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली. बेरोजगार तरुणांना गंडा घालणाऱ्या भामट्यास अटक केल्याची माहिती मिळताच गृहमंत्री पाटील यांनी कोल्हापूर पोलिसांचे फोनवरून अभिनंदन केले.
व्याप्ती मोठी
भामटा गवळी हा १२ वर्षांपूर्वी सैन्यदलात लान्स नायक पदावर भरती झाला. त्याने भोपाळ, इंदोर, जम्मू-काश्मीर, सिकंदराबाद आदी ठिकाणच्या सैन्यदलात काम केले. त्यानंतर नोकरी सोडून दिली.
आपटेनगर येथे बंगला बांधला. काही वर्षांपूर्वी कौटुंबीक वादातून त्याची पत्नी चार वर्षाच्या मुलासह त्याला सोडून गेली. त्यामुळे सध्या तो एकटाच राहत असे. सैन्यातील कामाचा अनुभव, वक्तृत्व कौशल्य आणि सैन्यदलातील पोशाखाचे फोटो दाखवून तो तरुणांना भुरळ पाडत असे. त्याने सांगली, पुण्यासह कोल्हापूर जिल्ह्णांतील तरुणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.