कल्याणकारी योजना बंद करणाऱ्यांना हद्दपार करा
By Admin | Updated: October 31, 2015 00:25 IST2015-10-31T00:23:48+5:302015-10-31T00:25:56+5:30
हसन मुश्रीफ : पांजरपोळ, व्हीनस कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कनाननगरमध्ये सभा

कल्याणकारी योजना बंद करणाऱ्यांना हद्दपार करा
कोल्हापूर : राज्यात व केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या, पण या कल्याणकारी योजना महायुतीच्या सरकारने बंद करण्याचा धडाका लावला आहे. रेशनवरील धान्य बंद करून गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत थारा देऊ नका, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. पांजरपोळ, व्हीनस कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कनाननगर प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
आमदार मुश्रीफ म्हणाले, जाती-धर्मात भांडणे लावून तेढ निर्माण करायची आणि त्याचा लाभ मिळवायचा एवढाच भाजपचा धंदा सुरू आहे. गोविंद पानसरे यांचा दिवसाढवळ्या खून केला जातो. दादरीत एका गरिबाला ठेचून मारले जाते, कलबुर्गींचा खून होतो, या सर्व घटना देशाला हिटलरशाहीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत. कनाननगर प्रभागातील सभेत बोलताना ते म्हणाले, या भागाची अवस्था आदिवासी भागापेक्षा वाईट आहे. आगामी पाच वर्षांत हे चित्र बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असून कनाननगर पाहण्यासाठी लोक येतील, असा विकास येथे केला जाईल. दहा वर्षांपूर्वी ‘मंत्री आपल्या गावोगावी’ हा उपक्रम राबवून समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आगामी काळात या परिसराकडे लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. यावेळी आर. के. पोवार, वसंत कोगेकर, सुवर्णा कोगेकर, मधुकर काकडे, राजेंद्र पाटील, बळवंतराव माने, अनिल घाटगे, फिरोज जमादार, पी. जी. मांडरे, निसार पठाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)