गलेफ मिरवणूक उत्साहात
By Admin | Updated: July 15, 2015 01:17 IST2015-07-15T01:14:24+5:302015-07-15T01:17:54+5:30
बाबूजमाल साहेब उरुस : घोड्यांचा लचाजमा, सर्वधर्मियांचा सहभाग

गलेफ मिरवणूक उत्साहात
कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत पीर बाबूजमाल साहेब (शहाजमाल) यांच्या दर्गाह शरीफ येथील उरुसानिमित्त मंगळवारी रात्री काढण्यात आलेली गलेफ मिरवणूक उत्साहात पार पडली. यावेळी सर्वधर्मीय भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
येथील बाबूजमाल दर्गाह येथे प्रतिवर्षी हा उरूस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो. याअंतर्गत गलेफ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फकिरांचा रतीफ खेळ झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात रात्री सव्वादहा वाजता गलेफ मिरवणूक काढण्यात आली.
दर्गाहमध्ये फतेहा पठण झाल्यानंतर पारंपरिक वाद्ये, सजविलेल्या घोड्यांचा लवाजमा, बँडपथक आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीला सुरुवात झाली. गावकामगार पाटीलवाडा येथे फतेहा पठण झाले. त्यानंतर गुजरीमार्गे जुना राजवाडा (भवानी मंडप) येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या गादीच्या ठिकाणी फतेहा पठण झाले. त्यानंतर मिरवणूक शिवाजी पुतळा येथील घुडणपीर दर्गाहमध्ये आली. तेथून पापाची तिकटीमार्गे परत बाबूजमाल दर्गाह येथे आली. येथे नाथ-सलाम करून फतेहा पठण करण्यात आले.
या ठिकाणी हजरत पीर बाबूजमाल दर्गाह शरीफ यांना मान्यवरांच्या हस्ते गलेफ चढविण्यात आला. त्यानंतर प्रसाद वाटप करून उरुसाची सांगता झाली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी पहाटेपर्यंत दर्गाह खुला ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)