‘एमएच-०९’ला वगळणे हाच व्यवहार्य तोडगा
By Admin | Updated: May 17, 2015 01:07 IST2015-05-17T01:07:35+5:302015-05-17T01:07:35+5:30
धनंजय महाडिक : टोल विरोधी समितीने वस्तुस्थिती समजून घ्यावी

‘एमएच-०९’ला वगळणे हाच व्यवहार्य तोडगा
कोल्हापूर : महापालिकेची आर्थिक स्थिती व रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीचा खर्च पाहता ‘एमएच-०९’ वाहनांना वगळणे हाच व्यवहार्य तोडगा आहे. ही वस्तुस्थिती टोलविरोधी कृती समितीने समजून घ्यावी, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ‘गोकुळ’ व ‘केडीसीसी’ बँक निवडणूक आपल्या भूमिकेमुळेच सोपी झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूर टोलमुक्त व्हावा, याबाबत आजही आम्ही ठाम आहोत पण संपूर्ण टोलमाफ करताना मोठ्या अडचणी आहेत. एकवेळ सरकारने प्रकल्पाची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर आयआरबी कंपनी येथून गेली, तर पुढील तीस वर्षे रस्त्यांची दुरुस्ती कोणी व कशी करायची? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. महापालिकेची आर्थिक कुवत नाही, त्यांना डांबरी रस्त्यांची डागडुजी करता येत नाही तर सिमेंट रस्त्यांची काय करणार. याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही देखभाल, दुरूस्तीचा खर्च आवाक्याबाहेर असल्याचे म्हटले आहे. त्याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कोल्हापूरची वाहने टोलमधून वगळून इतर जिल्ह्यांतील वाहनांकडून वसूल करून घेणे, हाच व्यवहार्य तोडगा आहे. केडीसीसीसाठी आपण इच्छुक होतो; पण बॅँकेच्या हितासाठी दोन पावले मागे घेतल्याचेही ते म्हणाले.