जिल्ह्यात नीट परीक्षा सुरळीत, ७ केंद्रांवर ५ हजार ३०५ जणांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:46+5:302021-09-13T04:23:46+5:30
कोल्हापूर: कोरोनामुळे गेले दीड वर्ष लांबणीवर पडलेली मेडिकल प्रवेशासाठीची नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ७ केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. कोरोनासह ...

जिल्ह्यात नीट परीक्षा सुरळीत, ७ केंद्रांवर ५ हजार ३०५ जणांनी दिली परीक्षा
कोल्हापूर: कोरोनामुळे गेले दीड वर्ष लांबणीवर पडलेली मेडिकल प्रवेशासाठीची नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यातील ७ केंद्रावर सुरळीतपणे पार पडली. कोरोनासह अन्य सुरक्षेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कडक वातावरणात झालेली ही परीक्षा नाेंदणी झालेल्या ५ हजार ४७५ पैकी ५ हजार ३०५ जणांनी दिली. १७० जण गैरहजर राहिले.
जिल्ह्यात सायबर, केआयटी, डी.वाय.पाटील, गजानन महाराज गडहिंग्लज, घोडावत पॉलिटेक्निक व स्कूल, भारती विद्यापीठ या केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. गेल्या मार्चमध्ये ही परीक्षा होणार होती, पण कोरोनाचा कहर सुरू असल्याने ही परीक्षा लांबणीवर पडली होती. त्यामुळे मेडिकल क्षेत्र निवडणाऱ्या विद्यार्थ्यांची घालमेल सुरू होती. अखेर या रविवारी ही परीक्षा झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यासह त्यांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.
पेपर दुपारी २ ते ५ या वेळेत असलातरी सकाळी ११ वाजल्यापासू्न केंद्रावर परीक्षार्थीसह पालकांनी गर्दी केली होती. एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ११ ते दीड या वेळेत एन्ट्री देण्यासाठीची वेळ हॉल तिकीटवर देण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांची तपासणी करूनच आत सोडले जात होते. एका वेळी १५ मुले व १५ मुली असा ३० जणांनाच प्रवेश दिला जात होता. सॅनिटायझर, मास्कर, ग्लोज यांची सक्ती करण्यात आली होती.
चौकट
परीक्षा पालकांचीच
नीट परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची असल्याने पालकांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे, पण त्याचा अतिरेक झाल्याचे चित्र परीक्षा केंद्रावर दिसत होते. परीक्षार्थी विद्यार्थ्यापेक्षा पालकांची घालमेल जास्त दिसत होती. कागद, पेन यांच्यापासून ते विविध सूचना देताना पालक अधिक चिंतातूर दिसत होते. परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ला आल्यापासून ते सायंकाळी पाच वाजता पेपर सुटेपर्यंत पालक केंद्राबाहेर थांबूनच होते. रविवारी गौरीचा सण असताना आणि पाऊस असतानाही पालकांनी लावलेल्या हजेरीमुळे मुलांसाठी पालकांनीच परीक्षा दिल्यासारखे चित्र होते.
चौकट
११ दिव्यांगानी दिली परीक्षा
नीटची ही परीक्षा दिव्यांग गटातील ११ जणांनी दिली. २ ते ५ ही परीक्षेची वेळ असताना त्यांना या दिव्यांगाना मात्र एक तास वाढवून देत ते ६ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती.
चौकट
उशिरा पेपर दिल्याची तक्रार
केआयटी महाविद्यालयातील केंद्रावरील ४१ नंबरच्या ब्लॉकमध्ये पेपर २० मिनिटे उशिरा दिल्याने पेपर पूर्ण सोडवता आल्या नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या, पण प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. १८ ते २० मार्काचा पेपर सोडवता आला नसल्याने त्याचा पुढील प्रवेशावर परिणाम होणार असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या. साधारपणे २ ला पेपर असताना पावने दोन वाजता पेपर दिला जातो, पण या केंद्रावर २ वाजून ५ मिनिटांनी विद्यार्थ्यांच्या हातात पेपर पडला. तो पूर्ण वाचण्यासाठी २० मिनिटांचा अवधी गेल्याने पेपर पूर्ण साेडवण्यास वेळ पुरला नसल्याच्या तक्रारी आल्या.
(फोटो ओळी स्वतंत्र दिल्या आहेत)