माजी सैनिक व विधवा पत्नी यांना घरफाळा माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:34+5:302020-12-30T04:30:34+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना शंभर टक्के मालमत्ता कर (घरफाळा) माफी’ ...

माजी सैनिक व विधवा पत्नी यांना घरफाळा माफ
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना शंभर टक्के मालमत्ता कर (घरफाळा) माफी’ योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने सुरु केली.
महाराष्ट्र शासनाने ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी’ योजनेअंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था हद्दीतील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र. १३५ दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ने शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी प्रशासकीय ठराव क्रमांक ३, दिनांक १७ डिसेंबर २०२० ने त्यास मान्यता दिली आहे.
कोल्हापूर शहरात किती माजी सैनिक राहतात, याचा नेमका आकडा पालिका प्रशासनाकडे नाही. या योजनेचा लाभ फक्त माजी सैनिकांच्या वापरात असलेल्या रहिवासी मिळकतींना लागू असेल. दोघे हयात नसतील तर त्यांच्या अन्य कुटुंबियांना त्याचा लाभ मिळणार नाही. तसेच व्यावसायिक मिळकतीचा घरफाळा माफ होणार नाही. याआधी कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाने पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता, त्याची अंमलबजावणी सुरु झाली होती. तोपर्यंत राज्य सरकारने शंभर टक्के माफी देण्याचा निर्णय घेतला.
शहरातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे प्रमाणपत्र घरफाळा विभागामध्ये सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.