माजी संचालकांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती
By Admin | Updated: February 7, 2015 01:04 IST2015-02-07T01:04:17+5:302015-02-07T01:04:35+5:30
जिल्हा बँक कर्जप्रकरण : सहकारमंत्र्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अस्वस्थता

माजी संचालकांचे भवितव्य न्यायालयाच्या हाती
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या माजी संचालकांवर सहकारमंत्र्यांनी थेट कारवाईचा बडगाच उगारल्याने त्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या हातात उरले आहे. १४ फेबु्रवारीला संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची घोषणा केल्याने संचालकांचे धाबे दणाणले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यापाठोपाठ कॉँग्रेसच्या संचालकांनीही तयारी सुरू केली आहे. जिल्हा बॅँकेची विनातारण, अल्पतारण थकीत कर्जाची जबाबदारी प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ४५ माजी संचालक व एका अधिकाऱ्यावर निश्चित केली आहे. विभागीय सह निंबधक राजेंद्र दराडे यांनी संबधित संचालकांना जबाबदारी निश्चित केलेली रक्कम भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. तशा नोटिसा त्यांना लागू केल्याने संचालकांनी हातपाय हालवण्यास सुरुवात केली आहे.
कॉँग्रेसच्या माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसने उच्च न्यायालयात अपील करत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल चुकीचा आहे त्यामुळे कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे; पण सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काही केले तरी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जबाबदारीची रक्कम संबधितांकडून वसूल केली जाणारच, असे सांगितल्याने माजी संचालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
१४ फेबु्रवारीला संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणणार, अशी घोषणा केल्याने सरकार कारवाईबाबत ठाम असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कॉग्रेसच्या संचालकांनीही न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा परिस्थितीत संचालकांना केवळ न्यायालयच वाचवू शकते.
सहकारमंत्र्यांकडे २५ फेबु्रवारीला सुनावणी
कॉँग्रेसच्या माजी संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल केली होती. यावर २५ फेबु्रवारीला सुनावणी होणार आहे; पण याबाबत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून कॉँग्रेसचे संचालक सोमवारी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.