तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 13:10 IST2017-07-19T13:10:40+5:302017-07-19T13:10:40+5:30
कला, क्रीडा शिक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनास प्रारंभ

तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ शालेय क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १९ : शैक्षणिक वर्षातील तास कमी केल्याच्या निषेधार्थ कला व क्रीडा शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलनास प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे बुधवारी सकाळी संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे या निर्णयाच्या विरोधात निदर्शने करीत सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेवर बहिष्कार टाकला.
शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी २८ एप्रिल २०१७ रोजी कला, शारीरीक शिक्षण विषयाच्या तासिका निम्याने कमी करुन विद्यार्थी खेळाडू व शारीरीक शिक्षण शिक्षक यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे. याचा परिणाम विद्याथी खेळाडूंच्या शारीरीक क्षमतेवर होणार आहे. भावी पिढीच्या दृष्टीने घातक आहे. या निर्णयामुळे शाळेतील शिक्षकांची पदे धोक्यात आलेली आहेत. त्यासाठी कला व शारीरीक शिक्षण शिक्षकांनी बुधवारी सकाळी विभागीय क्रीडा संकुल येथे कोल्हापूर जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने बुधवारपासून सुरु होणाऱ्या सुब्रतो मुखर्जी चषक स्पर्धेवर बहीष्कार टाकला.
विशेष म्हणजे १९ ते २२ जुलै दरम्यान होणाऱ्या या स्पर्धा सुरळीत होतील व क्रीडा शिक्षकांच्या मागण्यावर या दरम्यान तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र, यावर अद्यापही तोडगा न निघाल्याने अखेर बुधवारी सकाळी महासंघाच्यावतीने मैदानावरच क्रीडा शिक्षकांनी शासनाविरोधात निदर्शने केली. त्यानंतर स्पर्धेच्या ठिकाणी जिल्हा क्रीडाअधिकारी माणिक वाघमारे यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी एकही प्रवेशिका दाखल झालेली नाही.
यावेळी कोल्हापूर शारीरीक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य आर.डी.पाटील, सचिव राजेंद्र बुवा, एस.व्ही.सुर्यवंशी, सयाजी पाटील, शेखर शहा, निशा कुलकर्णी, उमा भोसले, महेश सुर्यवंशी, रिची फर्नांडीस, लहू अंगज, युवराज मोळे, संताजी भोसले, विनय जाधव, संदीप पाटील, प्रदीप साळोखे आदी शंभरहून क्रीडा शिक्षक उपस्थितीत होते.