पुराव्यांवरून ‘अंबाबाई’ असल्याचेच सिद्ध
By Admin | Updated: November 30, 2015 01:10 IST2015-11-30T00:58:51+5:302015-11-30T01:10:26+5:30
रमेश कुलकर्णी यांचे आव्हान : कोणाला चर्चा करायची असल्यास इतिहास परिषदेचीही तयारी

पुराव्यांवरून ‘अंबाबाई’ असल्याचेच सिद्ध
कोल्हापूर : अंबाबाई संदर्भातील मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीचे पुरावे हे ती आदिमाया अंबाबाईच असल्याचे अधोरेखित करतात. यावर जर कुणा तज्ज्ञांना वा पंडितांना चर्चा करायची असल्यास दोन दिवस शाहू स्मारक भवनमध्ये इतिहास परिषद घेण्याची तयारी आहे, असे आव्हान अॅड. रमेश कुलकर्णी यांनी रविवारी येथे दिले.करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू स्मारक भवन येथे ‘आदिमाया अंबाबाई, पार्वती की लक्ष्मी?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत होते. यावेळी मंडळाचे कार्यवाह दिलीप पाटील, सहकार्यवाह वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, निवासराव साळोखे, डॉ. शिवाजीराव हिलगे, शैलजा भोसले, आदी प्रमुख उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, याबाबत जर कोणी मौन बाळगत असेल तर आपल्या मताशी सहमतीच असेल असे गृहीत धरू, असेही अॅड. कुलकर्णी म्हणाले. अंबाबाईचा महालक्ष्मी किंवा लक्ष्मीशी काहीही संबंध नाही. तसेच महालक्ष्मीचा तिरुपतीशीही काहीही संबंध नाही. मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीच्या काळातील पुरावे हे आदिमाया अंबाबाई असल्याचेच सिद्ध करतात. बौद्ध धर्माचा प्रसार वाढल्यावर आंध्र प्रदेशमध्ये वैष्णव पंथाच्या लोकांनी इ.स. ८२६ मध्ये तिरुपती मंदिराची स्थापना केली; तर त्यापूर्वी चालुक्य राजाने इ.स. ५५० मध्ये अंबाबाईचे मंदिर कोल्हापुरात बांधले. यावरून तिरुपती मंदिर हे अंबाबाई मंदिरानंतर झाल्याचे स्पष्ट होेते. मग अंबाबाई तिरुपतीची पत्नी कशी काय होऊ शकते, हा प्रश्न आहे. जर कोणाला हे योग्य वाटत नसेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत. अंबाबाईच्या मूर्तीवरील नागासह असंख्य पुरावे या मूर्तीसह मंदिरात मिळतात. त्यानुसार हे मंदिर शैव असल्याचे स्पष्ट होते. इतर पुराव्यांमध्ये लक्ष्मीचे स्वतंत्र असे मंदिर भारतात कोठेही नाही. ती नेहमी विष्णूबरोबर असल्याने त्या दोघांचीच मंदिरे आढळतात. एकट्या देवीचे मंदिर हे फक्त पार्वतीच्या रूपातील देवीचेच असते. (उदा. काली, दुर्गा, महामाया, महालक्ष्मी) अशी मंदिरे देशभर आहेत. या पुराव्यांवरून अंबाबाईच असल्याचे सिद्ध होते. आमची सर्व देवींवर श्रद्धा आहे. परंतु, ज्या देवीचे जिथे स्थान आहे, तिथेच ते रहावे, आपल्याला हवे म्हणून नको तो खेळ करू नये. (प्रतिनिधी)
प्रशासन, पुजाऱ्यांना आवाहन : पुरावे ग्राह्य धरा
देवीचे स्वरूप हे पार्वतीचे असताना अंबाबाईची कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीची पूजा बांधण्याचा पुजाऱ्यांचा हेतू स्वच्छ दिसत नाही. यामागे मोठे अर्थकारण दडले आहे. येथील ७५ टक्के उत्पन्न हे नाहक पुजाऱ्यांच्या खिशात जाते. त्याचा उपयोग मंदिर संवर्धनासाठी अथवा अन्य कामांसाठी होत नाही. सर्व पुरावे अंबाबाई असल्याचे स्पष्ट असताना जिल्हा प्रशासन व पुजारी हे का मानत नाहीत? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी केला.
अंबाबाई भक्तांच्या मागण्या
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मूर्तीवर नाग घडविण्यासाठी शासनाने तातडीने सर्व समावेशक समिती स्थापन करावी.
कोल्हापुरातील सर्व संस्था व शासकीय कार्यालयांनी मंदिराचा उल्लेख अंबाबाई असा करावा.
भक्तांनी देवीला अर्पण केलेली दक्षिणा योग्य ठिकाणी जमा होण्यासाठी दर्शन रांगेत फलक व ध्वनिक्षेपकामार्फत आवाहन करण्यात यावे.