महाडिकांनी व्यक्तिगत त्रास दिल्याचा पुरावा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2015 00:38 IST2015-10-16T00:32:32+5:302015-10-16T00:38:20+5:30
सतेज पाटील यांचे आव्हान : सुडाचे राजकारण करीत असतो तर महाडिक हेच टार्गेट ठेवले असते

महाडिकांनी व्यक्तिगत त्रास दिल्याचा पुरावा द्यावा
कोल्हापूर : ‘मी सुडाचे राजकारण करतो, असा माझ्यावर विरोधक आरोप करीत असतात. जर खरंच मी असे सुडाचे राजकारण केले असते तर अन्य कुणा व्यक्तींपेक्षा एवढ्या सगळ्या भानगडी करणारे आमदार महादेवराव महाडिक हेच माझे मुख्य टार्गेट असते. महाडिक भाजपच्या कळपात गेल्यावरच का आरोप करीत आहेत? कॉँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर का बोलले नाहीत? जर मी त्यांना व्यक्तिगत त्रास दिला असेल तर त्याचा त्यांनी पुरावा द्यावा’, असे आव्हान माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिले.
पाच वर्षे गृहराज्यमंत्री असताना मी कोणाबद्दलही व्यक्तिगत सुडाचे राजकारण केले नाही. जर तसे करायचेच असते तर मग माझे पहिले टार्गेट महाडिकच असते. त्यांनी तर अनेक भानगडी केल्या आहेत; पण मी त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु काही गोष्टींशी माझा संबंध जोडून लोकांमध्ये माझी प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे. महाडिक कॉँग्रेसचे आहेत, मीही कॉँग्रेसचा आहे; पण त्यांनी पक्षीय पातळीवर गेल्या पाच वर्षांत हा विषय कधीच मांडला नाही; परंतु भाजपच्या कळपात गेल्यावर त्यांनी हा आरोप करायला सुरुवात केली आहे, यात मला बदनाम करणे आणि माझ्याविरोधात नकारात्मक भूमिका तयार करणे एवढाच त्यांचा हेतू आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.
आधी तुमचे चेहरे पहा
कॉँग्रेसकडे चेहरा नसल्याची टीका पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती, याबाबत विचारले असता सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांवरच पलटवार केला. पक्षाचे नेतृत्व करीत असताना कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून आपले फोटो डिजिटल फलकांवर झळकले आहेत; पण पालकमंत्र्यांनी आधी त्यांचे फलक पाहावेत. नरेंद्र मोदी यांच्यासोबत फलकावर आजूबाजूला क्लब चालविणाऱ्याचे, मटका घेणाऱ्यांचे फोटो आहेत. त्यामुळे त्यांनी आधी त्यांचे चेहरे पाहावेत.
जनतेच्या ताकदीवर जिंकणार
जनतेच्या विश्वासावर, ताकदीवर कॉँग्रेस ही निवडणूक लढवीत आहे. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक स्वबळावर जिंकणार आहोत. बहुमतासाठीचा आकडा गाठणार असल्याने कोणाशीही आघाडी करण्याचा संबंध येणार नाही, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी काय केले?
कोल्हापूर शहरात गेल्या पाच वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेत कोल्हापूरचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती; परंतु यामध्ये राजकीय अभिनिवेश आडवा आला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत की, त्यांचे केंद्रात वजन नाही, हे कळले नाही. वास्तविक त्यांनी एक बैठक घेऊन या योजनेत समावेशाबाबत मार्ग काढायला पाहिजे होता. आम्ही ४२५ कोटींची थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. मग त्यांना शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करणे का जमले नाही? असा सवालच सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
छुपी युती
कोणाशीही नाही
या निवडणुकीत आमची लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या विरोधातच आहे. ज्या पक्षाला ८१ प्रभागांत उमेदवार मिळत नाहीत, म्हणून त्यांना आघाडी करावी लागते, म्हणूनच भाजप आमचा विरोधक नाही. आम्ही कोणाशीही छुपी आघाडी केलेली नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत जाऊ, असा आत्मविश्वास आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा विस्तार झाल्यामुळे आम्हाला आघाडी करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.