‘आयडीबीआय’मध्ये बचत गट बेदखल

By Admin | Updated: November 20, 2015 00:04 IST2015-11-19T23:59:59+5:302015-11-20T00:04:00+5:30

अधिकाऱ्याचा मनमानीपणा : खाते क्रमांकासाठी विलंब

Evicting savings group in 'IDBI' | ‘आयडीबीआय’मध्ये बचत गट बेदखल

‘आयडीबीआय’मध्ये बचत गट बेदखल

कोल्हापूर : चंदूर (ता. हातकणंगले) येथील ‘आयडीबीआय’ बँकेतील सहायक व्यवस्थापक चंद्रकांत साबळे यांनी मनमानीपणे महिला बचत गटांना खाते उघडून देण्यासाठी तीन महिन्यांचा विलंब केला आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळी कागदपत्रे मागत महिलांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत, असा आरोप बचत गटातील महिलांचा आहे.
प्रत्येकाचे बँकेत खाते असावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन-धन योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अनेक बँकांनी खास कक्ष स्थापन केला आहे. या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी कधीही बँकेत पाय न ठेवलेल्या अनेकजणांनी खाते उघडले. एका बाजूला असे चित्र असताना दुसऱ्या बाजूला चंदूर येथील ‘आयडीबीआय’ बँकेकडून खाते उघडून देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे संताप व्यक्तहोत आहे.
याबाबत माहिती अशी, धुळेश्वर, शिवकृपा, अहिल्यादेवी या बचत गटांतील महिला या बँकेत सेव्हिंग खाते उघडण्यासाठी २० जूनला गेल्या होत्या. त्यासाठी आवश्यक असणारे पैसेही भरले. मात्र, खाते क्रमांक देण्यासाठी साबळे टाळाटाळ करू लागले. बचत गटातील सर्व महिला बँकेत उपस्थित असल्याशिवाय खाते क्रमांक देता येणार नाही, असे तोंडी सांगितले. ज्या महिलांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. त्यांना बचत गटातून काढावे, गटाचे खाते चालविण्यासाठी अध्यक्ष, सचिव यांच्या व्यतिरिक्त उपाध्यक्ष नेमण्यात यावे, अशी अट ते घालत आहेत. यासंबंधीची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील सहायक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी यांनी साबळे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आता बँकेची वेळ संपली आहे, असे बेजबाबदार उत्तर दिले.
तिन्ही बचत गटांच्या महिलांची वैयक्तिक बँक खाती आहेत, त्याची खात्री करून खाते नंबर त्वरित द्यावेत, अशी विनंती पानारी यांनी केली. मात्र, याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. अशा प्रकारे मनमानी सेवा देत ही शाखा महिला सक्षमीकरणाला अप्रत्यक्षरीत्या अडथळा आणत आहेत. त्यामुळे यातील दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे दिले आहे. (प्रतिनिधी)

चंदूर शाखेतील महिला बचत गटांसंबंधीची तक्रार आली आहे. दोषींवर कारवाईचे अधिकार विभागीय कार्यालयास आहेत. त्यामुळे तक्रार अर्ज विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे.
- एस. जे. देवूसकर,
जिल्हा समन्वयक,
आय.डी.बी.आय. बँक

Web Title: Evicting savings group in 'IDBI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.