कोल्हापुरातील प्रत्येक झाडांचा होणार ‘सात-बारा’
By Admin | Updated: July 2, 2015 01:11 IST2015-07-02T01:11:36+5:302015-07-02T01:11:56+5:30
२१ प्रभागांत अडीच लाख झाडे : जीपीएस प्रणालीव्दारे स्थळनिश्चिती; सर्वेक्षण पूर्ण होण्यास सहा महिने लागणार

कोल्हापुरातील प्रत्येक झाडांचा होणार ‘सात-बारा’
कोल्हापूर : माणसाच्या जन्म-मृत्यू नोंदीप्रमाणेच शहरात असणाऱ्या सर्व झाडांच्या जीपीएस प्रणालीद्वारे ‘डाटा’ तयार करण्याचे काम सुरू आहे. महापालिका हद्दीतील २१ प्रभागांतील वृक्षगणना पूर्ण झाली असून, त्यामध्ये विविध प्रकारची अडीच लाख झाडे असल्याचे समोर आले आहे. शहरातील वृक्षसंपदा नेमकी किती व कशा प्रकारची आहे याची संपूर्ण माहिती संकलित होण्यास अद्याप सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.शहरातील एकूण ४० प्रभागांनुसार टेर्राकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वृक्षसंपदेची संपूर्ण माहिती संकलित करण्याचा ठेका देण्यात आला आहे. १५ प्रभागांतील डाटा संकलित झाला आहे. सहा प्रभागांतील काम सुरू असून, त्यानंतर उर्वरित १४ प्रभागांतील काम हाती घेण्यात येणार आहे. अडीच लाखांपैकी
६४ झाडे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.जीपीएस प्रणालीद्वारे झाडांची जागा रेखांश व अक्षांशानुसार निश्चित केली जाणार आहे. झाडांचे शास्त्रीय नाव, स्थानिक नाव, वय, ठिकाण (खासगी जागा, शासकीय, महापालिका, औद्योगिक की इतर) उंची, घेरा, प्रकार (औषधी, शोभीवंत, फळझाड), सद्य:स्थिती (रोगट, ताकदवान, कापलेले की धोकादायक) आदी प्रकारांत वर्गीकरण केले जाणार असल्याची माहिती कंपनीचे संचालक आदित्य भार्नुके व प्रोजेक्ट मॅनेजर धनंजय राऊळ यांनी सांगितले.
शहरातील झाडांची सद्य:स्थिती काय आहे ते या सर्वेक्षणात पुढे येईल. कोणत्या भागात वृक्षसंपदा कमी आहे त्याचा अभ्यास करून जाणीवपूर्वक झाडांची लागवड करणे सोपे होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नेमक्या झाडाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळेल.
- प्रतिभा राजेघाटगे, उद्यान अधीक्षिक ा, महापालिका
आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार शहरात सुबाभूळ, नदीकाठावर बच्चा, आंबा, निलगिरी, करंज, कडूलिंब, नारळ ही झाडे मोठ्या संख्येने असल्याचे पुढे आले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
जीपीएस तंत्राच्या आधारे झाडाची संपूर्ण माहितीचे संकलन व एकत्रीकरण केले जाते. झाडाची संपूर्ण माहितीसह त्याची जागा निश्चित केली जाते. भविष्यात एखादे झाड तोडल्याची तक्रार आल्यास संकलित माहितीच्या आधारे शहानिशा करणे सोपे होणार आहे. प्रत्येक झाडाची इत्यंभूत माहिती असणार सात-बाराच यामुळे तयार होणार आहे. एका क्लिकवर शहरातील सर्व वृक्षसंपदेची माहिती मिळेल.