कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन जोडणीला खो !
By Admin | Updated: June 23, 2015 00:20 IST2015-06-23T00:20:50+5:302015-06-23T00:20:50+5:30
विद्यार्थ्यांचे नाकीनऊ : सेतू केंद्रातून विविध दाखले मिळण्यास अडचण; दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यासह पालकांची झुंबड

कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन जोडणीला खो !
कोल्हापूर : दहावी आणि बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न, अधिवास, रहिवासी, नॉनक्रिमिलेअर आदी दाखले प्रवेश अर्जासोबत सक्तीचे असल्याने कसबा बावडा येथील सेंट्रल बिल्डींगमध्ये असलेल्या सेतू केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. मात्र, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी आॅनलाईन कनेक्टिव्हीटी न मिळाल्याने हे दाखले वेळेत मिळताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊआले आहे.
नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे जून महिना आला की, शाळा, महाविद्यालयीन, अभियांत्रिकी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी पदविका, कृषी पदविका, कृषी प्रमाणपत्र कोर्स, वैद्यकीय आदी शाखांना प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होते. त्याचप्रमाणे या प्रवेशांसाठी प्रवेश अर्जासोबत सत्य गुणपत्रिकेसोबत शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र, अधिवास, रहिवासी, रहिवास डोंगरी आदी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना जोडावी लागतात. मात्र, प्रवेशाची अंतिम तारीख आणि दाखला मिळण्याची अंतिम तारीख दोन्ही जवळ असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही सँडविच होते. यात दिवसाला उत्पन्नाचा, नॉनक्रिमिलेअर, रहिवासी आदी दाखले काढण्यासाठी सध्या सेतू केंद्रात दिवसाला २०० हून अधिक अर्ज येतात. तर ६० ते ७० विविध दाखले विद्यार्थ्यांना अग्रक्रमानुसार आलेल्या अर्जानुसार दिले जातात. प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतरच हे दाखले त्वरित मिळावेत, अशी अपेक्षा असते. मात्र, हे दाखले कधी आणि किती दिवस आधी काढले तरी चालतात, याबद्दल माहिती नसल्याने अनेक पालक अगदी प्रवेश तोंडावर आल्यावरच या सेतु केंद्रांकडे धाव घेतात. एकाच वेळी सर्व पालक विद्यार्थी आल्याने सेतू केंद्रामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते.
महाआॅनलाईनचा सर्व्हर डाऊनच
राज्यभरात महाआॅनलाईन हा सरकारचा सर्व्हर राज्यभरातील सेतू केंद्रांना जोडला आहे. हा सर्व्हर मुंबई येथे असल्याने राज्यभरातील सेतू केंद्रांचा भार यावर आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळीच या सर्व्हरचा वेग मंदावतो. त्यामुळे दाखले देण्यास विलंब होत आहे.
दिवसाला या सर्व्हरवर सध्या प्रवेशाचे दिवस असल्याने अडीच लाखांहून अधिक अर्ज दाखल होत आहेत. त्यामुळे क्षमता कमी अन् भार जास्त झाल्याने वेग मंदावणे, मध्येच सलग्नता
तुटणे, सर्व्हर डाऊन होणे असे प्रकार घडत
आहेत.
दाखल्यांसाठी हेही करता येईल
उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी केवळ ३३ रुपये शुल्क आकारणी केली जाते. तर हा दाखला एप्रिलनंतर केव्हाही काढला तरी चालतो. तर जातीचा, नॉनक्रिमिलिअर, शेतकरी, अधिवास आदी दाखले ६ महिन्यांत कधीही काढले तरी चालतात. या दाखल्यांसाठी ३३ रुपयांचे शुल्क व अॅफिडेव्हिटचे ३३ रुपये असे एकूण ६६ रुपये खर्च येतो. त्यामुळे पालकवर्गाने जून महिना आल्यानंतरच जागे होऊन हे दाखले काढण्यासाठी धाऊ नये. त्यापूर्वीच प्रवेश इच्छुक दहावी, बारावीच्या पालक, विद्यार्थ्यांनी हे काढले तरी चालतात. आॅक्टोबर महिन्यात सर्व शाळांमध्ये दाखल्यांसाठी शिबिरेही
आयोजित केल्या जातात. पण याकडे लक्ष कोण देत
नाही.