आयुष्याच्या संध्याकाळची सोबत...
By Admin | Updated: August 19, 2015 00:12 IST2015-08-19T00:12:50+5:302015-08-19T00:12:50+5:30
डे केअर सेंटरचे उद्घाटन : वृद्धांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी उपक्रम

आयुष्याच्या संध्याकाळची सोबत...
कोल्हापूर : कुटुंबातील कर्ती माणसं, वाढते धकाधकीचे जीवन, ताणतणावाखाली लहान मुलांचे आणि महाविद्यालयीन तरुणाईचे स्वत:चे विश्व अशा परिस्थितीत कुटुंबातील वृद्धांना मात्र दिवसभर एकटेपणाला सामोरे जावे लागते. वृद्धांना आयुष्याची ही संध्याकाळ समवयस्क व्यक्तींसोबत आनंदात घालवता यावी, यासाठी मनीष देसाई यांच्यावतीने ‘सोबत डे केअर सेंटर’ची सुरुवात केली आहे. देवकर पाणंद येथील तेंडुलकर सदनमध्ये जाणीव चॅरिटेबल फौंडेशनच्यावतीने सुरू केलेल्या या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर व सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांच्या हस्ते झाले. मनीष देसाई यांचे वडील शैलेंद्र देसाई यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम सुरू केला आहे.
यावेळी शिपूरकर म्हणाले, आपल्या वडिलांच्या स्मृती एका सामाजिक कार्याने करणाऱ्या देसाई कुटुंबाचे विशेष अभिनंदन. अनेक लोक प्रसिद्धीच्या हव्यासाने उपक्रम घेत असतात; पण त्यापासून दूर राहत देसाई यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ आनंददायी होणार आहे.
किशोर देशपांडे म्हणाले, तारुण्यात आपल्याला छंद असलेल्या अनेक गोष्टी करायच्या राहून गेलेल्या असतात. वृद्धत्व हा काळ म्हणजे माणसाचा जणू पुनर्जन्म असतो. या कालावधीत मिळणारा वेळ आपले सर्व छंद जोपासण्यासाठी, हौस, मौज आणि इच्छा पूर्ण करण्यासाठीच असतो. त्यामुळे हा काळ मनसोक्त जगा, काही मदत लागली तर ऋणानुबंध ट्रस्ट सहकार्य देईल.
देसाई यांनी वडिलांच्या आठवणी जागविल्या. स्मिता नाईक यांनी प्रास्ताविकात मनोबल ट्रस्टची माहिती दिली. अश्विनी नाईक यांनी इशस्तवन केले. रविदर्शन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)