यंदाही गणेश विसर्जन कृत्रिम कुंडातच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:58+5:302021-09-14T04:28:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गौरी-गणपती विसर्जनास गर्दी होऊ नये म्हणून यंदा पंचगंगा नदी घाट, ...

यंदाही गणेश विसर्जन कृत्रिम कुंडातच होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गौरी-गणपती विसर्जनास गर्दी होऊ नये म्हणून यंदा पंचगंगा नदी घाट, राजाराम बंधारा यासह रंकाळा, राजाराम, कोटीतीर्थ तलाव या ठिकाणी गौरी-गणपती विसर्जनास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत प्रत्येक प्रभागात दोन सार्वजनिक कृत्रिम कुंड निर्माण करण्यात आले असून, त्याठिकाणीच गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. स्थानिक महापालिका प्रशासनानेही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. प्रत्येक वर्षी रंकाळा तलाव, कोटीतीर्थ, राजाराम तलाव तसेच राजाराम बंधारा व पंचगंगा नदीघाटावर होणारी गर्दी लक्षात घेऊन त्याठिकाणी गणेश विसर्जन करण्यास मज्जाव केला आहे. या परिसराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात येणार असून, पोलीस, महापालिका कर्मचारी, केएमटी तसेच अग्निशमन दलाचे जवान बंदोबस्तास असणार आहेत.
शहरातील प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे १६० ठिकाणी महानगरपालिकेने कृत्रिम विसर्जन कुंड तयार करून ठेवले आहेत. त्याठिकाणीच नागरिकांनी गणेश विसर्जन करायचे आहे. विसर्जित गणेशमूर्ती ताब्यात घेऊन महापालिकेचे कर्मचारी त्यांचे विसर्जन इराणी खणीत करणार आहेत. त्यासाठी वेगळी यंत्रणा कार्यरत ठेवली आहे. याशिवाय शहरातील सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फेही विसर्जन कुंड तयार केले आहेत. रुईकर कॉलनी येथे माजी नगरसेविका उमा इंगळे यांनी ट्रॅक्टरमधून काहील घेऊन जाऊन घरोघरी गणेशमूर्ती दान म्हणून स्वीकारणार आहेत.
-पॉईंटर -
- प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे १६० कुंडांची व्यवस्था.
- रंकाळा परिसरात सहा ठिकाणी विसर्जन कुंडांची व्यवस्था.
-पंचगंगा नदीघाटावर पंचगंगा संवर्धन समिती पाहणार व्यवस्था.
- विसर्जित मूर्तींचे नंतर फक्त इराणी खणीतच होणार विसर्जन.
- मूर्ती विसर्जनासाठी पवडीचे २०० कर्मचारी मदत करणार.
- विसर्जनस्थळी स्वच्छता करण्याकरिता ३०० कर्मचारी नियुक्त.
- विसर्जनस्थळी वैद्यकीय पथके, अग्निशमन दलाची पथके असणार.
- इराणी खणीभोवती बॅरिकेट, लाईटची विशेष सुविधा.
-