महापालिका निवडणुकीची छोट्या राजकीय पक्षांचीही तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST2020-12-06T04:27:02+5:302020-12-06T04:27:02+5:30
कोल्हापूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांसह शहरातील सात ते आठ छोटे राजकीय पक्ष देखील ...

महापालिका निवडणुकीची छोट्या राजकीय पक्षांचीही तयारी
कोल्हापूर : कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांसह शहरातील सात ते आठ छोटे राजकीय पक्ष देखील कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. निवडणुकीत किती जागा लढवायच्या, किती जागा जिंकायच्या यापेक्षा आपले अस्तित्व दाखविण्यासाठीच या पक्षांची निवडणूक रिंगणात उतरण्यामागची भूमिका राहील, असे दिसते.
सन २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वाभिमानी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रासप, बसप, एस फोर ए यांनी त्यांचे उमेदवार उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांना त्यावेळी पडलेली मते पाहता, त्यांच्या उमेदवारांचा निवडणुकीत टिकाव लागला नाही. त्यांच्या काही उमेदवारांनी तर उगीच निवडणूक लढवायची म्हणून लढविली. या छाेट्या पक्षाच्या उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारांनी अनेक प्रभागांत जादा मते घेतली होती.
या सर्व छोट्या पक्षांच्या बाबतीत गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी फार वेगळे वातावरण आहे असे काहीच नाही. पक्षाचे अस्तित्व संपायची वेळ आली तरी त्या त्या पक्षातही गटबाजी, एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न होत असल्याने त्यांची ताकद अधिकच क्षीण झाली आहे. तरीही या पक्षांनी महापालिकेची निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. कार्यकर्ते निवडणूक लढविण्याकरिता चाचपणी करत आहेत.
यावेळी स्वाभिमानी पक्षाने किमान चाळीस जागा लढविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. ‘स्वाभिमानी’च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यातच महापालिकेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्यांनी शहराच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सक्षम उमेदवारांचाही शोध घेतला जात आहे.
आम आदमी पार्टीने यंदाच्या निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी शहरातील सार्वजनिक आरोग्य, रस्ते, सांडपाणी निर्गत, घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या बाबींवर अभ्यास केला आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी तेथील पक्षाच्या सरकारने सेवा सुविधा दिल्या आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरात कशा देता येतील यावर देखील आराखडे तयार केले आहेत. सर्वसामान्य जनता कोल्हापुरात आम आदमी पक्षाशी जोडली जावी हाही एक प्रयत्न निवडणुकीच्या निमित्ताने केला जात आहे. पक्षाचे दिल्लीतील काही नेते निवडणुकीदरम्यान कोल्हापुरात थांबणार आहेत.