एक जरी टोल रद्द केला, तरी सत्कार करूनी
By Admin | Updated: February 25, 2015 00:38 IST2015-02-25T00:34:59+5:302015-02-25T00:38:24+5:30
नीतेश राणे : स्वाभिमान संघटनेची कोल्हापुरात स्थापना, सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका

एक जरी टोल रद्द केला, तरी सत्कार करूनी
कोल्हापूर : सत्तेवर आल्यानंतर कोल्हापूरसह राज्य टोलमुक्त करू, असे आश्वासन दिलेले आताचे सरकार अजून राज्यातील एकही टोल रद्द केलेले नाही. नव्याने टोल सुरू करत आहेत. एक जरी टोल रद्द केला, तरी सत्ताधाऱ्यांचे ‘स्वाभिमान’तर्फे नागरी सत्कार करू, असे आव्हान स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार नीतेश राणे यांनी दिले.
स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेनिमित्त मंगळवारी दसरा चौकात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. जयेश कदम अध्यक्षस्थानी होते. आमदार राणे म्हणाले, शिवसेना अनेक वर्षांपासून मराठीच्या नावाने गळा काढत आहे. आता सत्तेत आहे, ‘सामना’ऐवजी त्यांनी आता विधिमंडळात ओरडावे. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारवर ३०२ खाली (खुनाचा) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता फडणवीस मुख्यमंत्री असलेले सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात ९३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची शासकीय कार्यालये आणि उद्योग गुजरातला स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन तोडकर यांनी स्वागत केले. सम्राट महाडिक यांनी प्रास्ताविक केले. ‘स्वाभिमान’चे रम्मी रजपूत, मनोज कदम, सिद्धार्थ वानखेडे, सतीश चव्हाण यांची भाषणे झाली. अशोक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पुरोगामी महाराष्ट्राला डाग...
अॅड. गोविंद पानसरे यांची हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला डाग आहे. दाभोलकर यांच्या हत्येनंतर मारेकरी सापडत नसल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागणारे आताचे मुख्यमंत्री फडणवीस काय करणार? असेही राणे म्हणाले.