पंचनामे करून दीड वर्ष लोटले तरी दमडीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:37+5:302021-03-26T04:22:37+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने ...

पंचनामे करून दीड वर्ष लोटले तरी दमडीही नाही
कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कारही झाले, नुकसानभरपाईचा ७९ कोटींचा आकडाही निश्चित झाला. आता या सर्व घटनाक्रमाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; पण यातील दमडीची मदत ना कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मिळाली ना महावितरणला.
कोल्हापूूर जिल्ह्याने ऑगस्ट २०१९ मध्ये अभूतपूर्व अशा महापुराचा सामना केला. आठ दिवसांनी महापूर ओसरला तरी यात महावितरणची बहुतांश यंत्रणा गाळात रुतून बसली, काही वाहून गेली. यात कृषिपंपाची अवस्था तर त्याहून बिकट होती. नदीकाठच वाहून गेल्याने मोटारी डीपीसह वाहून गेल्या. कोल्हापुरातून राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यानिमित्ताने गाठीभेटी घेण्यात आल्या. याचे पंचनामे सुरू करण्यात आले, तोपर्यंत राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्याने हा सर्व विषय मागे पडला. सतेज पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन पंचनामे करून तयार झालेल्या अहवालानुसार नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी २८ लाख रुपये शासन देईल, असे जाहीर केले. या घटनेलाही आता नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी केलेल्या घोषणेप्रमाणे एक रुपयाचीही मदत अद्याप मिळालेली नाही.
चौकट ०१
महापुरात झालेले नुकसान
महावितरण: ६५ कोटी ४४ लाख
कृषिपंपधारक: १३ कोटी ८४ लाख
वैयक्तिक पंचनामा झालेले कृषी ग्राहक: ७ हजार ८८९
पंचनामा केलेल्या सिंचन योजना: २८०
चौकट ०२
महावितरणचे नुकसान
महापुरात महावितरणच्या जिल्ह्यातील २६ उपकेंद्रांत शेती व बिगरशेती असे वर्गीकरण करून बाधित संख्या काढण्यात आली. यात बिगरशेतीमध्ये ग्राहकांचे उच्चदाब वाहिन्या ५४८, रोहित्र ३५७० उच्चदाब खांब १२५, लघुदाब खांब ३१६ अशा २ लाख ४१ हजार ३९८ ग्राहकांचे नुकसान झाले. शेतीवर्गात उच्च दाब वाहिन्या २१८, रोहित्र ७ हजार ६०१, उच्चदाब खांब १५८१, लघुदाब खांब ५ हजार ५७ अशा ९६ हजार ६२१ ग्राहकांचे नुकसान झाले.
प्रतिक्रिया
शासन ढिम्म आहे. आधी कृषिपंपधारकांना झुलवले, आता घरगुती ग्राहकांना झुलवत आहे. दीड- दोन वर्षे जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही.
-विक्रांत पाटील किणीकर, राज्य इरिगेशन फेडरेशन