‘रस्ते विकास’चे मूल्यांकन २५० कोटी
By Admin | Updated: July 23, 2015 00:31 IST2015-07-23T00:31:08+5:302015-07-23T00:31:31+5:30
शहरातील रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची बैठक होत आहे. यावेळी ‘नोबल’ने केलेला मूल्यांकन अहवाल बैठकीत सादर केला जाणार आहे.

‘रस्ते विकास’चे मूल्यांकन २५० कोटी
कोल्हापूर : शहरातील एकात्मिक रस्ते प्रकल्पातील दर्जाहीन कामांची किंमत वजावट न करता २५० कोटी रुपये संपूर्ण प्रकल्पाचे मूल्य होत असल्याचा अहवाल ‘नोबल इंटरेस्ट कन्सल्टन्सी इंजिनिअर्स’ने तयार केला आहे, अशी माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. ‘नोबल’ने ठरवलेल्या किमतीतून प्रकल्पातून केलेली दर्जाहीन कामे व ‘आयआरबी’ला दिलेल्या भूखंडाची बाजारभावाने किंमत वजा केल्यास प्रकल्पाची किंमत १५० कोटींपेक्षा कमी होणार आहे. या सर्व मुद्द्यावर आज, गुरुवारी ‘एमएसआरडीसी’च्या कार्यालयात होणाऱ्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या मुंबईतील कार्यालयात शहरातील रस्ते प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीची बैठक होत आहे. यावेळी ‘नोबल’ने केलेला मूल्यांकन अहवाल बैठकीत सादर केला जाणार आहे. ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.
महापालिकेने ‘आयआरबी’ला टेंबलाईवाडी येथे दिलेल्या भूखंडाची किंमत ७५ कोटी रुपये होते. यासाठी खास दोन एफएसआय देण्यात आले आहेत. त्यामुळे यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. करारानुसार अपूर्ण चौक सुशोभीकरण, बस स्टॉप, युटिलिटी शिफ्टिंग, क ाँक्रिटच्या रस्त्याला गेलेले तडे, अर्धवट पदपथ व पथदिवे, अपूर्ण गटारी, आदी कामांची किंमत अहवालातून वजा करण्यात येणार आहे. ही सर्व वजावट केल्यास प्रकल्पाची किंमत १५० कोटींपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींवर मुंबईतील बैठकीत चर्चा व निर्णय होणार असल्याने याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (प्रतिनिधी)