‘इथेनॉल’साठी केंद्र सरकार चाळीस टक्के कर्ज देणार
By Admin | Updated: December 11, 2014 23:52 IST2014-12-11T22:23:54+5:302014-12-11T23:52:15+5:30
केंद्र सरकारने सध्या इंधनामध्ये १० टक्केइथेनॉल मिश्रणासाठी परवानगी दिलेली आहे.

‘इथेनॉल’साठी केंद्र सरकार चाळीस टक्के कर्ज देणार
जयसिंगपूर : इथेनॉल निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार इथेनॉलच्या परियोजनेसाठी साखर विकास निधीमधून साखर कारखान्यांना ४० टक्के सुलभ कर्ज देत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. खासदार राजू शेट्टी यांनी इथेनॉल निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी केंद्र सरकारने कोणती ठोस पावले उचलेली आहेत, यासंदर्भात अतारांकित प्रश्न विचारला होता. याबाबत मंत्री प्रधान यांनी हे उत्तर दिले असल्याची माहिती, स्वाभिमानी पक्षाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. केंद्र सरकारने सध्या इंधनामध्ये १० टक्केइथेनॉल मिश्रणासाठी परवानगी दिलेली आहे. सध्या ५ टक्के अनिवार्य केलेले आहे. केंद्र सरकार यावर प्रोत्साहन योजना आणत आहे. उत्तरोत्तर याचा विकास करण्यात येईल, जेणेकरून पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढेल. यासाठी साखर विकासाच्या मुद्द्यासाठी कृषिमंत्री आणि अन्न व उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे. शिवाय या संबंधित सर्व विभागातील सचिवांचाही यामध्ये समावेश केलेला आहे. त्यांच्याकडून इथेनॉलच्या अधिक निर्मितीसाठी शिफारशी आलेल्या आहेत. त्याही स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)