कोल्हापूर : कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा प्रवेशपत्रिकेवरून गोंधळ झाला होता. प्रवेशपत्रिकेवर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे या शाळेची चाैकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सोमवारी व्हिडीओद्वारे दिली.गोसावी म्हणाले, या शाळेत प्रवेश देताना विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स व क्रॉप सायन्स, असे विषय सांगण्यात आले होते. मात्र, या शाळेला या दोन्ही विषयांची मान्यताच नाही. बारावी परीक्षेचे अर्ज भरता शाळेने मराठी आणि भूगोल हेच विषय लिहिले. हॉल तिकीट मिळाल्यावर विद्यार्थांना कॉम्प्युटर सायन्स, क्रॉप सायन्स हे विषय घेता येणार नसल्याचे समजले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. कॉलेजमध्ये मोठा जमाव एकत्र जमला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर संस्था, सामाजिक कार्यकर्ते व पालकांनी राज्य आणि विभागीय मंडळाशी संपर्क साधला. पालकांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य मंडळाने कोल्हापूर विभागास निर्देश दिले. त्यानुसार विद्यार्थांनी ज्या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयाचे हॉल तिकीट बदलून देण्यात आले. मात्र, असे प्रकार घडू नयेत यासाठी शाळेची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
विद्यार्थ्यांची १३, १५ व १७ मार्चला प्रात्यक्षिक परीक्षाकॉम्प्युटर सायन्स, क्रॉप सायन्स विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा ज्या ठिकाणी अधिकृत हे विषय शिकवले जातात, त्या कॉलेजमध्ये १३, १५ व १७ मार्चला ही परीक्षा घेतली जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी म्हटले आहे.
७१ विद्यार्थ्यांना दिले विषय बदलूनया शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे विषय बदलले होते त्या ७१ विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील विषय सोमवारी बदलून देण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मंगळवारपासून व्यवस्थित परीक्षा देता येणार आहे.