एरंडोळ प्रकल्पग्रस्तांना जमिनी कसण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST2021-06-09T04:30:14+5:302021-06-09T04:30:14+5:30
आजरा : एरंडोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायद्याने मिळालेल्या जमिनी कसण्यास विरोध होत आहे. प्रकल्पग्रस्त जमीन कसण्यास गेले ...

एरंडोळ प्रकल्पग्रस्तांना जमिनी कसण्यास विरोध
आजरा :
एरंडोळ (ता. आजरा) येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन कायद्याने मिळालेल्या जमिनी कसण्यास विरोध होत आहे. प्रकल्पग्रस्त जमीन कसण्यास गेले असता जीवे मारण्याची धमकी तर महिलांना लज्जा निर्माण होईल, अशी शिवीगाळ केली जात आहे. याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बुधवार (१६ जून) रोजी सामूहिकपणे आंदोलन करीत जमीन कसण्यास जाणार आहोत, असा इशारा धरणग्रस्तांनी आजरा तहसीलदार यांना निवेदनातून दिला आहे.
एरंडोळ धरण होऊन २३ वर्षे झाली. धरण झाले पण अद्यापही तीन-चार लोकांना जमिनी मिळालेल्या नाहीत. तर मिळालेल्या जमिनी कसण्यास गेले असता संबंधित शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. याबाबत तहसील कार्यालयाकडे प्रकल्पग्रस्तांनी वारंवार तक्रारी दाखल केल्या आहेत. गट नंबर ११ मधील जमीन कसण्यास प्रकल्पग्रस्त गेले असता संजय माधव या शेतकऱ्याने जीवे मारण्याची धमकी देत महिलांना लज्जा उपलब्ध होईल, अशी शिवीगाळ केली. याबाबत आजरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली आहे. तरीही संबंधित शेतकऱ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.
आमच्या जमिनी गेल्या मात्र मिळालेल्या जमिनी कसण्यास विरोध होत आहे. त्यामुळे मंगळवार (१५ जून)पर्यंत धरणग्रस्तांना जमिनी कसण्यात अडथळा करणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही न झाल्यास बुधवार (१६ जून) श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सामूहिकपणे जमीन कसण्यास जात आहोत.
यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहिल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर शंकर पाटील, भीमराव माधव, भिकाजी पाटील, लक्ष्मण नाईक, शांताराम जाधव, संतू पाटील, सीताराम माधव यासह २० धरणग्रस्तांच्या स्वाक्षऱ्या आहेत.