‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:40+5:302021-01-08T05:22:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाहूपुरी तालीम प्रभाग क्रमांक २५ मध्ये यंदाचीही महापालिका निवडणूक चुरशीची ...

In the equivalent wrestling arena in ‘Shahupuri Talmi’ | ‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

‘शाहूपुरी तालमी’त तुल्यबळ मल्ल रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शाहूपुरी तालीम प्रभाग क्रमांक २५ मध्ये यंदाचीही महापालिका निवडणूक चुरशीची होणार असून तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने कही खुशी कही गम आहे. शेजारील व्हीनस कॉर्नर प्रभाग क्रमांक १४ महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे येथील इच्छुकांनीही या प्रभागातून चाचपणी सुरू केली आहे. सध्या ६ ते ७ इच्छुकांच्या नावांची चर्चा असली तरी, ऐनवेळी नवीन चेहरेही समोर येण्याची शक्यता आहे.

राजर्षी छत्रपती शाहू यांनी १०० वर्षांपूर्वी नियोजन करून शाहूपुरी ही व्यापारीपेठ वसवली. महापालिकेची प्रत्येक निवडणूक येथे अटीतटीची होते. येथील शाहूपुरी तालीम प्रभाग क्रमांक २५ नागरिकांचा मागास वर्गसाठी आणि शेजारील प्रभाग क्रमांक १४ व्हीनस कॉर्नर प्रभाग महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे अनेकांची गोची झाली आहे. शाहूपुरी परिसरातील माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचा या प्रभागावर वरचष्मा राहिला आहे. २००५ ते २०२० पर्यंत त्यांच्या कुटुंबाने पाच वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. यामध्ये २०१५ मध्ये प्रकाश नाईकनवरे आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे दोघेही शेजारी शेजारी प्रभागातून निवडून आले. यावेळी प्रतिभा नाईकनवरे यांना महापौरपदाची संधीही मिळाली. गत निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षित होता. यावेळी प्रकाश नाईकनवरे यांच्या स्नुषा पूजा नाईकवरे शाहूपुरी तालीम प्रभागातून विजयी झाल्या. शिवसेनेच्या वैष्णवी समर्थ यांनी त्यांना तगडे आव्हान दिले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.

यंदाच्या निवडणुकीत वैष्णवी समर्थ यांचे चिरंजीव अमर समर्थ या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यांचा शेजारील प्रभाग क्रमांक १४ मध्येही चांगला संपर्क आहे. दोन्ही प्रभागात महापूर आणि कोरोनामध्ये ते नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी शेजारील व्हीनस कॉर्नर प्रभागातून पत्नी समुद्धी यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदाची निवडणूक शिवसेनेऐवजी काँग्रेसमधून लढवणार आहेत.

शिवसेनेचे गटनेते राहुल चव्हाण यांचा प्रभाग क्रमांक १४ सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्याने ते शाहूपुरी तालीम प्रभागातून इच्छुक आहेत. तसेच पत्नीला व्हीनस कॉर्नर प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. गेल्या पाच वर्षात त्यांनी सभागृहात प्रभागातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. परिवहन समिती सभापती, शिवसेना गटनेता अशी पदे त्यांना मिळाली. याचबरोबर सुनील सन्नके, अमित टिक्के. धनंजय दुग्गे, गणेश काटे यांच्या पत्नी पूनम यांच्या नावांची चर्चा आहे.

चौक़ट

नाईकनवरे यांची ताराराणी आघाडीला सोडचिठ्ठी

प्रकाश नाईकनवरे यांनी या निवडणुकीत ताराराणी आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शाहूपुरी तालीम हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग झाल्यामुळे प्रकाश नाईकनवरे निवडणूक लढवणार नाहीत. स्नुषा पूजा नाईनकवरे यांना शेजारील व्हीनस कॉर्नर प्रभागातून निवडणूक रिंगणात उतरवणार आहे, तर शाहूपुरी तालीम प्रभागात गृहमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणण्यासाठी जिवाची बाजी लावणार आहेत.

प्रतिक्रिया...

विरोधी आघाडीत असतानाही अडीच कोटींचा निधी खेचून आणला. शाहूपुरी भाजी मार्केट येथे कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे टाकीवर पाणी चढत नाही. येथून बायपासने पाणीपुरवठा केला. सभागृहात प्रभागातील समस्या प्रभावीपणे मांडून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

पूजा नाईकनवरे, नगरसेविका

चौकट

पाच वर्षात झालेली विकासकामे

चार सांस्कृतिक हॉलची उभारणी

पिण्याची पाईपलाईन, ड्रेनेजलाईन आणि रस्ते डांबरीकरण

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी बोअर

अमृत योजनेतून पिण्याची पाईपलाईन

इलईडी दिवे बसवले

समस्या...

शाहूपुरी भाजी मंडई परिसरात १० वर्षापासून पाण्याची टाकी बांधूनही धूळ खात

बाजारपेठ असल्यामुळे पार्किंगची डोकेदुखी

पंत बाळेकुंद्री मार्केट १५ वर्षापासून वापराविना धूळ खात

बागल चौक ते बीटी कॉलेज रस्त्याची दुरवस्था

शाहूपुरी तिसरी, चौथी आणि सहाव्या गल्लीतील रस्ते खराब

खाऊ गल्लीत पार्किंगची समस्या

अवैध व्यवसायांचा नागरिकांना त्रास

चौकट

पूजा नाईकनवरे (ताराराणी आघाडी) २२६१

वैष्णवी समर्थ (शिवसेना) १९५५

दीपाली डोईफोडे (राष्ट्रवादी) २७९

दीपाली जाधव (काँग्रेस) ५०

चौकट

तीन कुटुंबांच्या दोन प्रभागावर नजरा

अमर समर्थ आणि राहुल चव्हाण शाहूपुरी तालीम आणि व्हीनस कॉर्नर या दोन प्रभागात इच्छुक आहेत. एका प्रभागातून स्वत:, तर दुसऱ्या प्रभागात पत्नी असे त्यांचे नियोजन आहे, तर पूजा नाईकनवरे व्हीनस कॉर्नरमधून इच्छुक आहेत. चव्हाण शिवसेनेतून, तर नाईकनवरे आणि समर्थ काँग्रेसमधून इच्छुक आहेत. उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागून असून तगडे उमेदवार असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

फोटो : ०७०१२०२० कोल केएमसी शाहूपुरी तालीम

ओळी : कोल्हापुरातील शाहूपुरी तालीम प्रभागात पंत बाळेकुंद्री मार्केट वापराविना धूळ खात पडले आहे.

Web Title: In the equivalent wrestling arena in ‘Shahupuri Talmi’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.