राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्याची वनराई, गव्यासाठी प्रसिद्ध असलेले राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वनअधिकारी एस. एस. पवार (वन्यजीव) व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे.राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवा रेडा व इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो पर्यटक हे अभयारण्य पहायला येत असतात. ३१ डिसेंबर वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लास्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये, असे आवाहन वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्यात पर्यटकांना दोन दिवस प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:51 IST