कर्जाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या
By Admin | Updated: April 8, 2017 00:25 IST2017-04-08T00:25:25+5:302017-04-08T00:25:25+5:30
नैराश्येतून कृत्य; टेंभूत रेल्वेखाली संपविली जीवनयात्रा

कर्जाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या
कऱ्हाड : येथील वाखाण परिसरात राहणाऱ्या उद्योजकाने कर्जाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली. टेंभू, ता. कऱ्हाड येथे घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी (वय ५०)
असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभू येथे रेल्वे रूळावर गुरुवारी मध्यरात्री एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर याबाबत कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यास कळविण्यात आले. तालुका पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन
तत्काळ तपासाला सुरुवात केली. रेल्वेच्या धडकेमुळे मृतदेह छिन्नविच्छिन्न स्थितीत होता. परिणामी, संबंधिताची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी आल्या. परिसरात चौकशी करूनही ओळख पटत नव्हती. दरम्यान, घटनास्थळापासून काही अंतरावर एक कार बेवारस उभी असल्याचे निदर्शनास आले. संबंधित कारची पोलिसांनी माहिती घेतली त्यावेळी ती कऱ्हाडच्या वाखाण परिसरात राहणाऱ्या श्रीकांत कुलकर्णी या उद्योजकाची असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी
सकाळी पोलिसांनी कुलकर्णी यांच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. नातेवाइकांनी तो मृतदेह कुलकर्णी यांचाच असल्याचे ओळखले.
शहरातील वाखाण परिसरात मैत्री पार्क इमारतीत श्रीकांत कुलकर्णी वास्तव्यास होते. त्यांची मलकापूर-कोयना वसाहत येथे ‘मधुकर इंडस्ट्रीज’ नावाची कंपनी आहे. त्यांची पत्नी कऱ्हाडातील एका नामांकित बँकेची माजी संचालक असून, मुलगा जर्मनीत, तर मुलगी अहमदाबादमध्ये
नोकरीस आहे. गत महिन्यापासून श्रीकांत कुलकर्णी नैराश्यात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. कर्जाला
कंटाळून कुलकर्णी यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर येत
आहे. (प्रतिनिधी)