उद्योजकास आत्महत्याप्रकरणी सूत व्यापारी, दलालास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:26+5:302021-01-13T05:03:26+5:30
इचलकरंजी : परत केलेली रक्कम व त्यावरील व्याजाच्या रकमेचा तगादा लावून उद्योजकास आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एक सूत व्यापारी ...

उद्योजकास आत्महत्याप्रकरणी सूत व्यापारी, दलालास अटक
इचलकरंजी : परत केलेली रक्कम व त्यावरील व्याजाच्या रकमेचा तगादा लावून उद्योजकास आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एक सूत व्यापारी व एक दलाल अशा दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी (दि. ९) अटक केली. रविवारी त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता बुधवार (दि. १३)पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अशा प्रकरणात सूत व्यापारी व दलाल यांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या घटनेमुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. ही घटना ३० नोव्हेंबर २०२० ला घडली होती.
शैलेंद्र श्रीनिवास भंडारी (वय ४५) व उमेश बाळासाहेब खोचगे (३९, दोघे रा. जुना चंदूर रोड, इचलकरंजी) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, महेश हणमंत जावळे यांनी वरील दोघा संशयितांकडून कच्चे सूत घेऊन त्यांना वेळोवेळी सुताची रक्कम दिली होती. तरीही त्या दोघांनी महेश यांच्याकडे सुताचे १७ लाख रुपये व त्यावरील व्याज देणे बाकी आहे, असे सांगून जबरदस्तीने विजया बॅँक व नूतन बॅँकेच्या धनादेशांवर सह्या घेतल्या. तसेच त्यांना दमदाटी करून कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर महेश यांचे सायझिंग विकण्यास या दोघांनी भाग पाडून कामगारांना धमकावले होते, या वारंवारच्या त्रासाला कंटाळून महेश यांनी रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. याबाबतची तक्रार शुभांगी महेश जावळे (३३, रा. जवाहरनगर) यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात त्यावेळी दिली होती.