कोल्हापूरसाठी संपूर्ण टोलमुक्ती हीच भूमिका : साळोखे
By Admin | Updated: June 1, 2015 00:51 IST2015-06-01T00:36:21+5:302015-06-01T00:51:33+5:30
संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही.

कोल्हापूरसाठी संपूर्ण टोलमुक्ती हीच भूमिका : साळोखे
कोल्हापूर : कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त व आय.आर.बी. कंपनीला येथून हटविणे हीच शेवटपर्यंत जनतेची भूमिका असल्याचे कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी रविवारी ‘लोकमत’ला बोलताना सांगितले.साळोखे म्हणाले, कोल्हापुरात गतआठवड्यात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, एमएच ०९ पासिंगची वाहने वगळण्याबाबत आम्हीच अधिसूचना काढू नका, असे सांगितले होते. संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही. राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीचे अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. सुमारे २० जूनपर्यंत फेरमूल्यांकन समिती राज्य शासनाला आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस सरकार यावर निर्णय घेईल. त्याचबरोबर पूर्वी कोल्हापुरात झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन हे मंत्रालयात बसून झाले होते; पण, सध्याच्या फेरमूल्यांकन समितीमध्ये असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ, कोल्हापूर महापालिका व टोलविरोधी कृती समितीतील सदस्यांनी पारदर्शकपणे व प्रत्यक्ष सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा अहवाल सकारात्मक असेल. ही समिती जून महिन्यात सरकारला अहवाल देईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे यातून निर्णय घेऊन कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त करणार आहेत.
दरम्यान, टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांनी कोल्हापुरात भाजप राज्यस्तरीय बैठकीवेळी ‘कोल्हापूरला संपूर्ण टोलमुक्ती केली जाईल,’ असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)