इस्लामपूर शहरात प्रबोधनात्मक फलक
By Admin | Updated: July 25, 2014 23:34 IST2014-07-25T23:16:50+5:302014-07-25T23:34:11+5:30
अनोखा उपक्रम : पोलीस-सराफांचा पुढाकार

इस्लामपूर शहरात प्रबोधनात्मक फलक
इस्लामपूर : इस्लामपूर शहर व परिसरात महिलांचे सोन्याचे दागिने लुबाडण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी साखळी चोरांपासून महिलांनी दक्षता पाळावी म्हणून महिलांचे प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले.
येथील बसस्थानक परिसरात शहर पोलीस व इस्लामपूर सराफ असोसिएशनतर्फे महिलांना सावध करणाऱ्या या फलकाचे अनावरण पोलीस निरीक्षक संजय पाटील, सराफ संघटनेचे अध्यक्ष दिनेश पोरवाल, तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी पो. नि. संजय पाटील म्हणाले की, सोने, दागिने चोरणाऱ्या अथवा लुबाडणाऱ्यांकडून महिलांना, पुढे खून झाला आहे, आग लागली आहे, दंगल सुरु आहे अशी कारणे सांगितली जातात. अशावेळी महिलांनी त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देऊ नये. दागिने सुरक्षित पध्दतीने वापरल्यास अशा चोऱ्या टाळता येतील.
पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रबोधन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साखळी चोऱ्यांबाबत प्रबोधन करणारे फलक लावण्यात येणार आहेत. यावेळी फौजदार बापूसाहेब पवार, छगनशेठ रायगांधी, भीमराव देवकर, राजेंद्र ओसवाल, प्रीतम गांधी, राजेंद्र पोरवाल, राहुल पोरवाल, दिलीप रायगांधी, चंद्रकांत पाटील, महेंद्र कोठारी, नितीन ओसवाल, राहुल राठोड उपस्थित होते. (वार्ताहर)