-महाविद्यालयांत प्रबोधन : व्यसनाधिनता घटली , शाळा
By Admin | Updated: July 29, 2014 23:07 IST2014-07-29T00:08:32+5:302014-07-29T23:07:45+5:30
५७ लाखांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त

-महाविद्यालयांत प्रबोधन : व्यसनाधिनता घटली , शाळा
एकनाथ पाटील -कोल्हापूर-- कर्नाटक सीमेवरून कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांत सुगंधी तंबाखू व गुटख्याची चोरून होणाऱ्या आयातीवर पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाने चांगलाच लगाम घातला आहे.
तरुणाई व्यसनांपासून अलिप्त राहावी, यासाठी राज्य शासनाने घेतलेल्या गुटखाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी दोन्ही विभागाकडून केली जात आहे. वर्षभरात गुटखा व सुगंधी तंबाखू तस्करांवर ४२ गुन्हे दाखल करून, ५७ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करून तो नाश
करण्यात आला आहे. उद्या मंगळवार अमली पदार्थविरोधी दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा.
कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश तरुणवर्ग गुटखा व सुगंधी तंबाखूच्या अधीन गेल्याचे विदारक चित्र होते. अनेकजण अतिव्यसनाधिन होऊन मृत्यूमुखीही पडले. शासनाने यावर बंदी घातल्याने विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये गुटखा खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अन्न व औषध विभागाच्या पथकाने वर्षभरात ४२ ठिकाणी छापे टाकून सुमारे ५७ लाखांचा माल जप्त केला, तर १४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.
दंडात्मक कारवाईतून सरकारला १३ लाख ३७ हजार रुपये मिळाले. गुटखाबंदी आणखी तीव्र होण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. जकात नाका, चेक पोस्टची तपासणी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये सुगंधी तंबाखू व गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. अन्न व औषध प्रशासनाने येथील गोदामासह शहरातील पानटपरी, किराणा मालाचे दुकान, वाहनांतून येणारा गुटखा यावर कारवाई करून तस्करबहाद्दरांना चांगलाच चाप लावला आहे.
शाळा, महाविद्यालयीन परिसरात आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने विविध प्रबोधनात्मक पोस्टर्स लावली गेली आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी तरुणांत या गुटखा व तंबाखूची चांगलीच भीती निर्माण झाली आहे.
कारवाई
सुरूच राहणार
गुटखाबंदी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. शाळा, कॉलेज परिसरात चोरून गुटखा विकणाऱ्यांवरही पोलिसांचे पथक लक्ष ठेवून आहे. सुगंधी तंबाखू व गुटख्यावरील कारवाई ही सुरूच राहील.
डॉ. मनोजकुमार शर्मा,
पोलीस अधीक्षक
कडक अंमलबजावणी
गुटखा व सुगंधी तंबाखू यांच्या बंदीबाबत कडक अंमलबजावणी केली जात आहे. चोरून कोणी विकत असेल, तर त्याची माहिती नागरिकांनी आम्हाला द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
- संपतराव देशमुख, सहायक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर
प्रबोधनावर भर
गुटखाबंदीसाठी सर्व स्तरावर प्रबोधन केले जात आहे. सुगंधी तंबाखू व गुटखा सेवन केल्यानंतर त्याचे आरोग्यावर काय दृष्य परिणाम होतात, त्याचे पोस्टर्स बसस्टॉप, शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालये, पानटपरी, ग्रामपंचायत, आदी ठिकाणी लावली जात आहेत.- बी. आर. आरसुळकर, जिल्हा शल्य चिकित्सक, सीपीआर