अपघातप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह अभियंत्यास शिक्षा
By Admin | Updated: December 4, 2014 00:59 IST2014-12-04T00:58:43+5:302014-12-04T00:59:37+5:30
‘आयआरबी’चा रस्ता : टेंबलाई उड्डाणपुलावरील मृत्यू

अपघातप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह अभियंत्यास शिक्षा
कोल्हापूर : येथील टेंबलाई रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असताना दिलीप दादू अंब्रे (वय ३५, रा. मोहरे, ता. पन्हाळा) यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने प्रथमवर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी पुणे येथील बांधकाम ठेकेदारासह अभियंत्यास एक महिन्याचा कारावास व १० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा आज, बुधवारी सुनावली. संशयित आरोपी प्रकाश गंगाधर पटवर्धन (रा. पुणे) व सदाशिव मलाप्पा कुंभार (रा. कोरोची, ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापुरातील ‘आयआरबी’ कंपनीतर्फे झालेल्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील हे काम आहे. परंतु या अपघातप्रकरणी टोलविरोधी कृती समितीने त्यावेळी कंपनीवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही हा गुन्हा ठेकेदारांवर नोंदला गेल्याने कंपनी बाजूलाच राहिली आहे.
या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे टोलविरोधी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी, रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असताना दि. १७ जून २०११ रोजी दिलीप अंब्रे हे पहाटे दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी या उड्डाणपुलाचे काम सुरु होते.
सुमारे ५० टक्के काम झाले होते. त्यामुळे ठेकेदाराने पूल वाहतूकीसाठी बंद असल्याबाबतचे फलक लावायला हवा होता अथवा पूलावरील प्रवेशच बंद ठेवायला हवा होता परंतू त्यातील कोणतीच दक्षता न घेतल्याने पहाटेच्या अंधारात आंब्रे मोटारसायकलवरून पुलावरून दुचाकीसह खाली कोसळले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. आयआरबी कंपनीतर्फे पुण्यातील ठेकेदार प्रकाश पटवर्धन यांच्याकडे हे काम दिले होते.
हे काम अभियंता सदाशिव कुंभार यांच्या देखरेखीखाली सुरू होते. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल एस. बी. गाडवे यांनी अपघाताचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी आज, बुधवारी न्यायाधीश डांगे यांच्यासमोर झाली.
यावेळी सरकारी वकील रंजनी गुजरे यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश डांगे यांनी
संशयित आरोपी प्रकाश पटवर्धन व अभियंता सदाशिव कुंभार यांना एक महिन्याची शिक्षा व १० हजार ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)