मुख्यमंत्र्यांच्या दक्षिणस्वारीचे गूढ संपेना
By Admin | Updated: August 4, 2014 00:08 IST2014-08-03T23:59:47+5:302014-08-04T00:08:45+5:30
कऱ्हाड : दादांचं निमंत्रण, पतंगरावांचे संकेत; पण बाबांची चुप्पी !

मुख्यमंत्र्यांच्या दक्षिणस्वारीचे गूढ संपेना
प्रमोद सुकरे - कऱ्हाड , कोळे येथील कार्यक्रमात शनिवारी मदनदादांनी मुख्यमंत्र्यांना ‘तुम्हीच दक्षिणेतून लढा,’ असं जाहीर निमंत्रणच देऊन टाकल़ं मग उपस्थित पतंगरावांनीही लोकइच्छा असेल तर पृथ्वीराज नक्कीच उभे राहतील, असं सूतोवाच केलं; पण बाबांनी आपल्या भाषणात चुप्पीच साधल्याने त्यांचा दक्षिणस्वारीचा सस्पेन्स संपता संपेना झालाय़
कोळे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट संवाद कार्यक्रम शनिवारी उत्साहात झाला़ परिसरातील हजारो कार्यकर्त्यांनी त्याला हजेरी लावली़ या कार्यक्रमात सुरुवातीला ज्येष्ठ नेते मदनदादा मोहिते बोलायला उठले. त्यांनी दिवंगत आनंदराव चव्हाण, प्रेमिलाकाकी चव्हाण ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला़ चव्हाण कुटुंबीयांनी कऱ्हाडसाठी काय केलं, अशी गरळ ओकणाऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेत बाबांनी दिलेल्या निधीची उड्डाणे कोटींत आहेत, याची जाणीव करून दिली अन् ‘बाबा आता आम्हाला उतराई होण्याची संधी द्या, तुम्हीच दक्षिणेतून उभे राहा,’ अशी गळ घातली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मागणीला पाठिंबा दिलाच तर काहीनी शिट्ट्याही वाजविल्या. त्यावेळी बाबांच्या चेहऱ्यावर दिसलं ते फक्त एक स्मित हास्य़ मग काय, वनमंत्री पतंगराव कदम बोलायला उठले. त्यांनी आपल्या शैलीत फटकेबाजीच सुरू केली. ‘इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणेच बाबांनी रेटून; पण नियमात बसवून कऱ्हाडला भरपूर दिलंय. लोकइच्छा असेल तर ते दक्षिणेतून नक्कीच लढतील,’ असंच मंत्री कदम यांनी सांगून टाकलं़ पण, त्याबरोबरच कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायलाही ते विसरले नाहीत. मंत्री कदम म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना राज्यभर प्रचारासाठी फिरावं लागतं. उद्या ते दक्षिणेतून उभे राहिले तर बाबा माझ्या गावात, वाडीत, घराघरात मत मागायला आले पाहिजेत, अशी इच्छा बाळगू नका. तुम्ही स्वत:च उमेदवार म्हणून प्रचार करणार असाल तर बाबा तुमचे नक्की ऐकतील,’ असं सांगितल्यावर कार्यकर्त्यांच्यातून ‘काळजी करू नका’ असा आवाज आला़ अन् आता मुख्यमंत्री आपल्या भाषणात दक्षिणस्वारीवर काय बोलणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली; पण बाबांनी आपल्या भाषणात याबाबत चुप्पीच साधली, त्यामुळे त्यांच्या दक्षिणस्वारीचा सस्पेन्स आजही कायम दिसत आहे़
संपर्क दौऱ्यांचा चौकार
दक्षिणेवरील स्वारीची चाचपणी चालविलेल्या मुख्यमंत्र्यांचे कऱ्हाड दौरे वाढले आहेत़ त्यात दक्षिण मतदार संघावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे़ जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क, थेट संवाद कार्यक्रम करून ते जनमत जाणून घेत आहेत़ त्यासाठी प्रत्येक शनिवार-रविवार ते कऱ्हाड दौऱ्यावर असून, त्यांनी सलग आठवडी दौऱ्याचा चौकार मारला आहे़