कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणे असलेले दोन कोटी ७६ लाख रुपये गुरुवारी महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाले. त्यातील एक कोटी ६७ लाख रुपये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्याचा तसेच सप्टेंबर २०१९ मधील राहिलेल्या ५० टक्के पगाराची रक्कम सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
गतवर्षी एप्रिल महिन्यापासून कोविड काळात केएमटीच्या काही बस जिल्हाधिकाऱ्यांनी भाड्याने घेतल्या आहेत. त्याचे बिल दोन कोटी ७६ लाख रुपये भाडे महापालिकेला मिळायचे होते. यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर त्याच्या प्रयत्नांना गुरुवारी यश आले. या रकमेचा धनादेश महापालिकेला मिळाला.
कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींनी या रकमेचा उपयोग कर्मचाऱ्यांची देणी भागविण्याकरिता करावा, अशी मागणी लावून धरली होती. आमदार जाधव यांनीही तशाच सूचना दिल्या होत्या. ही रक्कम गुरुवारी मिळताच आमदार जाधव यांनी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक घेऊन या रकमेचे वाटप कसे करावे याबाबत सूचना दिल्या. बैठकीस प्रशासक बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसुळ, परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी नगरसेवक अनिल कदम, मनोज नार्वेकर, रवी इंगवले, मारुती पाटील, इर्शाद नायकवडी उपस्थित होते.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मिळालेल्या रकमेतून माहे सप्टेंबर २०१९ चा थकीत पगारापैकी पन्नास टक्के रक्कम द्यायची, २५ टक्के थकीत पगारामधील एक हप्ता द्यायचा निर्णय झाला. उर्वरित २५ टक्के थकीत पगारातील रक्कम लवकरात लवकर देण्यात येईल. सातवा वेतन व ऑर्डर संदर्भात कोरोना रोग कमी झाल्यावर लवकरच मीटिंग घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी ठरले.
निवृत्त कर्मचाऱ्यांना पावणेदोन कोटी
निवृत्त झालेल्या १५४ कर्मचाऱ्यांना केएमटी प्रशासन साडेपाच कोटी रुपये देणे लागते. या कर्मचाऱ्यांना एक कोटी ६७ लाख रुपये द्यावेत तसेच उरलेली रक्कम ही केएमटी बस मेंटेनन्ससाठी वापरावी, असे बैठकीत ठरले.