अतिक्रमणावरून निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:32+5:302021-02-16T04:24:32+5:30
गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील अतिक्रमित घरे शासनाच्या नियमानुसार मिळकतधारकांच्या नावावर करण्यासाठी स्थानिक गटनेत्यांची मंत्री सतेज पाटील व मंत्री ...

अतिक्रमणावरून निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद रंगला
गणपती कोळी : कुरुंदवाड
शहरातील अतिक्रमित घरे शासनाच्या नियमानुसार मिळकतधारकांच्या नावावर करण्यासाठी स्थानिक गटनेत्यांची मंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर अशी स्पर्धा रंगली आहे. दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे अतिक्रमणधारकांचा मेळावा घेऊन मंत्र्यांच्या माध्यमातून आपली जागा आपल्या नावावर करण्याचा विश्वास दिला आहे. अतिक्रमण विषयावरून शहरात निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवाद रंगला आहे. शहरातील सुमारे दीड हजाराहून मिळकतधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या जागेवर घरे बांधली आहेत. मात्र, ही घरे मिळकतधारकांच्या नावावर नसल्याने मिळकतधारकांना विविध योजनेच्या लाभाला मुकावे लागत आहे. या वर्षाअखेरीस पालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे बहुतांश शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय राजकीय गटनेत्यांनी घेतला आहे. त्यातच २०११ पूर्वीची अतिक्रमणे कायम करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याने या निर्णयाच्या आधारे अतिक्रमणधारकांचा प्रश्न निकाली काढून राजकीय श्रेय घेण्याचा खटाटोप गटनेत्यांचा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पुत्र व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी जयराम पाटील फौंडेशनच्यावतीने अतिक्रमण धारकांचा मेळावा घेऊन पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अतिक्रमण धारकांचा प्रश्न निकाली काढण्याचा विश्वास दिला आहे, तर दुसºयाच दिवशी यड्रावकर गटाने शहर अन्याय निवारण कृती समितीच्या माध्यमातून रविवारी (दि. १४) मंत्री यड्रावकरांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेऊन अतिक्रमणधारकांना न्याय देण्याचा विश्वास दिला आहे.
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न राजकीय नेत्यांनी मंत्र्याच्या माध्यमातून ऐरणीवर आणल्याने अतिक्रमणधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, हा विषय निवडणुकीपुरते मर्यादित न राहता निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून मार्गी लावावा, हीच अपेक्षा अतिक्रमधारकांकडून आहेत.
चौकट - मोहिमेत विजय पाटील आघाडीवर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील यांनी अतिक्रमण धारकांची कागदपत्रे एकत्रित करण्याबरोबरच अपुरी कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवत आहेत. शिवाय कागदपत्रात काही त्रुटी राहू नये यासाठी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागातील अनुभवी लोकांची टीम राबवत असल्याने या मोहिमेत पाटील आघाडीवर आहेत.