राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील सुमारे ८० पाणंद रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. या पाणंदीवरील अतिक्रमणे आणि झाडे-झुडपे हटवून शेतीच्या वहिवाटीसाठी हे रस्ते तातडीने खुली करावीत, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना शेतजमिनींची देखरेख, मशागत व पीक काढणीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर, इतर वाहने व अवजारांची ने-आण करण्यासाठी प्रत्येक गावात पूर्वीपासूनच पाणंद रस्ते ठेवण्यात आले आहेत.
परंतु, झाडे-झुडपे वाढल्यामुळे, दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांच्या अतिक्रमणामुळे आणि संबंधित शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे अनेक पाणंद रस्त्यांवरील वहिवाट बंद झाली. त्यामुळे गावोगावच्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदने, तक्रारी देऊन पाणंद रस्ते खुली करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महसूल विभागाने खास मोहीम राबवून तालुक्यातील सर्वच पाणंद रस्ते शेतीच्या वहिवाटीसाठी खुली करावीत अशी, शेतकऱ्यांची मागणी आहे. --------------------------
* लोकप्रतिनिधींनी पुढे यावे
वर्षानुवर्षे प्रलंबित पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधित गावातील लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे. ज्या रस्त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. त्यांची नावे देण्याबरोबरच ती हटविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठीदेखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढे यावे. शासकीय योजना आणि लोकसहभागातून पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. तरच पाणंदीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.
--------------------------
* या गावातील पाणंदी गुदरमल्या !
नेसरी, कडगाव, मनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी, ऐनापूर, माद्याळ काा नूल, औरनाळ, हनिमनाळ, हसूरचंपू, तनवडी, महागांव, कळविकट्टे, हसूरवाडी, हसूरसासगिरी, करंबळी, वडरगे, हिरलगे, शेंद्री, जरळी, हरळी खुर्द, हरळी बुद्रुक, लिंगनूर काा नूल, नांगनूर, खणदाळ, आदी गावांतील पाणंद रस्ते खुली करण्याची मागणी आहे.