वस्त्रोद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात
By Admin | Updated: February 2, 2015 00:10 IST2015-02-01T23:52:04+5:302015-02-02T00:10:28+5:30
वस्त्रोद्योग समितीचा अहवाल : राज्यात कापूस ते तयार कपडे संपूर्ण प्रक्रिया राबवावी

वस्त्रोद्योग वाढीसाठी उद्योजकांना प्रोत्साहनपर योजना राबवाव्यात
इचलकरंजी : राज्यातील वस्त्रोद्योग वाढीसाठी या उद्योगाचा आढावा घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या आमदार सुरेश हाळवणकर यांच्या समितीने अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार, पणन, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यामध्ये कापूस ते तयार कपडे ही प्रक्रिया राज्यातच राबविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहनात्मक योजना राबवणे, तसेच वस्त्रोद्योग असलेल्या शहरात टेक्स्टाईल हब उभारणीची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार हाळवणकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक आणि दहा लाख नवे रोजगार निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे. सहकारी संस्थांचे बळकटीकरण, चीनप्रमाणे टेक्स्टाईल हब राज्य सरकारने पायलट प्रोजेक्ट सुरू करावे, टेक्स्टाईल प्रोसेसिंग पार्क, वस्त्रोद्योगात एफडीआय, यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ, वीजदरासाठी वेगळे टॅरिफ या प्रमुख मुद्द्यांवर विस्तृत मांडणी अहवालात केली आहे.जिल्हा आणि तालुका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, लघुउद्योग व टेक्निकल टेक्स्टाईलमधील मध्यम उद्योगांसाठी भांडवली अनुदान देण्यात यावे, अशा प्रमुख शिफारशीही केल्या आहेत.