विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करा
By Admin | Updated: November 10, 2014 00:43 IST2014-11-10T00:08:46+5:302014-11-10T00:43:00+5:30
राष्ट्रीय शिक्षण परिषद : अरविंद दीक्षित यांचे शिक्षकांना आवाहन

विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करा
कोल्हापूर : शिक्षकांनी चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतल्यास विद्यार्थीही नेहमी चांगल्या, समाजाभिमुख कामासाठी आग्रही राहतील. त्यामुळे शिक्षकांनी बदलत्या काळाप्रमाणे नव्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करावे, असे आवाहन निवृत्त शिक्षण उपसंचालक अरविंद दीक्षित यांनी आज, रविवारी येथे केले.
येथील २० व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामपुरीतील संयुक्त महाराष्ट्र सोसायटीच्या सभागृहातील या परिषदेचे आयोजन शिक्षक विकास परिषद, ज्ञानदीप मंडळ, शिक्षक विकास प्रतिष्ठान आणि गोवा राज्य कला व संस्कृती संचालनालयाने आयोजन केले होते. यावेळी डॉ. विजयकुमार शहा, केंद्रीय कार्यालयीन भाषा विभागाचे डॉ. जयशंकर यादव, गोव्याचे आरोग्य व्यवस्थापक सूरज नाईक, किशोर श्रीवास्तव प्रमुख उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, देशाचा विकास हा विद्यार्थ्यांच्या हाती असून, अशा भावी पिढीला घडविण्याचे म्हणजेच राष्ट्र उभारणीचे कार्य करण्यात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकीज्ञान देण्यापेक्षा त्यांना विविध क्षेत्रांतील सर्वांगीण ज्ञान द्यावे.
डॉ. शहा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा असून, तिला वाव देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे. शालेय जीवनातच त्यांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करायचे शिक्षण दिल्यास ते निश्चितपणे जीवनात यशस्वी होऊ होतील. त्यांना नवे काम करण्याची सकारात्मक प्रेरणा मिळते.
यावेळी मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. ललिता जोगड, सुनीलकुमार सरनाईक, अखिला पठाण, मा. पां. कुलकर्णी, तुकाराम पाटील, शिक्षक विकास परिषदेचे उपाध्यक्ष एस. एस. वेळगेकर, सचिव एस. एम. गडकरी, सहसचिव मारुती कुंभार, खजानीस डी. सी. खानविलकर, एन. एस. सामंत, गोपाळ चितारी, आदी उपस्थित होते. शिक्षक विकास परिषदेचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अॅलन बोर्जीस, एम. एम. मोदी यांनी सूत्रसंचालन केले. गोपाळ गुरव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
देशभरातील ८३ शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर येथील २० व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली आदी १५ राज्यांतील ८३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षणभूषण व समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी शिक्षक विकास परिषदेच्या विशेषांकाचे प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन झाले.