हेल्पलाईन नंबर सक्षम करणार

By Admin | Updated: November 26, 2015 00:30 IST2015-11-26T00:30:54+5:302015-11-26T00:30:54+5:30

पोलीस अधीक्षक : १०३ बरोबर १०९१ नंबरबाबत जागृती

Enable helpline number | हेल्पलाईन नंबर सक्षम करणार

हेल्पलाईन नंबर सक्षम करणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या १०३ या क्रमांकाबरोबरच १०९१ या ‘हेल्पलाईन’ नंबरची जागृती सर्वसामान्य नागरिकांत करण्यासाठी येत्या काही दिवसांत धडक आराखडा तयार करण्यात येणार असून, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात विशेष पथके नेमून हा विभाग कार्यक्षम करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अत्याचारग्रस्त महिलांना तातडीने पोलिसांचे सहकार्य मिळावे, या उद्देशाने १०३ या क्रमांकाची पोलीस ‘हेल्पलाईन’ची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे; पण हा क्रमांकच बंद असतो, तर जागृती अभावी या हेल्पलाईनला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या योजनेचा कोल्हापुरात फज्जा उडाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने आंतरराष्ट्रीय महिला अत्याचारविरोधी दिनाच्या निमित्ताने बुधवारच्या अंकात मांडले होते. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शर्मा यांनी तातडीने हा विभाग सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत शर्मा म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यासाठी १०३ अथवा १०९१ या फोन नंबरवर ‘हेल्पलाईन’ योजना राबविली आहे; पण १०३ हा नंबर कोल्हापूर जिल्ह्यातून लावल्यास ठाणे येथे पोलीस नियंत्रण कक्षास लागतो. त्यामुळे या नंबरवर कोल्हापुरातील महिलांनी नोंदविलेली तक्रार ठाणे नियंत्रण कक्षातून कोल्हापूरच्या १०९१ या नंबरवर कळविली जाते. त्यामुळे या महिलांना तातडीने मदत देण्यात अडथळे येतात. तसेच १०९१ हा क्रमांक लक्षात ठेवण्यास गैरसोयीचा असल्याने या हेल्पलाईन नंबरवर
थेट तक्रार नोंदविण्याचे प्रमाण अगदीच अल्प आहे. या हेल्पलाईनवरून थेट कोल्हापूरच्या महिला दक्षता समितीशी संपर्क साधता येतो.
त्यामुळे आता या फोन नंबरची सर्वसामान्य लोकांमध्ये जागृती करण्यासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेणार आहे. तक्रार आल्यास तातडीने कारवाई करण्यासाठी महिला पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात येणार आहे. तसेच हा विभाग सक्षम करण्यासाठी येत्या काही दिवसांत कार्यक्रमांचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिली.
 

महिलांवरील वाढत्या अत्याचारांना दाद मागण्यासाठी हेल्पलाईन नंबरची सेवा कौतुकास्पद आहे; पण हे हेल्पलाईनचे फोन नंबर प्रसिद्ध करून सहा ते सात वर्षे उलटली तरीही ते सामान्य युवतींना माहीत नाहीत. नंबरबाबत जागृतीसाठी पोलीस खाते अपयशी ठरले आहे. या हेल्पलाईन नंबरबाबत जनजागृती करण्यासाठी पोलीस यंत्रणेने ठोस पावले उचलावीत, मगच हेल्पलाईनमागील उद्देश सफल होईल.
- तेजश्री राजेंद्र वारके
 

राज्य शासनाने सुरू केलेली १०३, तसेच कोल्हापूर पोलिसांची १०९१ या फोन नंबरची ही हेल्पलाईन योजना महिलांवरील अत्याचारांबाबत दाद मागण्यासाठी असली तरी ही हेल्पलाईन योजना आम्हाला माहीतच नाही. या योजनेला जागृतावस्था आणण्यासाठी पोलीस खात्याने विशेष प्रयत्न केल्यास पोलीस खात्याबाबत युवती अगर महिलांचा पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच सुधारेल. - प्रियंका राजू माने

Web Title: Enable helpline number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.