कर्मचाऱ्यांचे दोन तास आंदोलन

By Admin | Updated: April 8, 2015 00:36 IST2015-04-08T00:16:20+5:302015-04-08T00:36:16+5:30

इचलकरंजी नगरपालिका : संगेवार यांना दमदाटी प्रकरण; कुंभार यांचे नगरसेवकपद रद्दची मागणी

Employees' two-hour movement | कर्मचाऱ्यांचे दोन तास आंदोलन

कर्मचाऱ्यांचे दोन तास आंदोलन

इचलकरंजी : येथील नगरपालिकेचे आरोग्य विभागाकडील प्रभारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना नगरसेवक मोहन कुंभार यांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तास काम बंद आंदोलन केले. आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला. आंदोलकर्ते कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारात कुंभार यांच्या निषेधार्थ निदर्शने केली.दरम्यान, कुंभार यांच्या दादागिरी करण्याच्या कृत्याच्या निषेधार्थ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली. तसेच डॉ. संगेवार यांच्यावर नगरसेवक कुंभार यांनी त्यांच्या पत्नीचा विनयभंग डॉ. संगेवार यांनी केल्याची तक्रार दिल्याबद्दल कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी त्याबाबतची नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त केली. यावर नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी कुंभार यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. आज सकाळी नगरपालिका सुरू होताच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनास सुरुवात केली. सर्व कर्मचारी प्रवेशद्वारात जमले व त्यांनी घोषणाबाजी करीत नगरपालिका दणाणून सोडली. नगराध्यक्ष बिरंजे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, डॉ. सुनीलदत्त संगेवार, तसेच सभापती व काही नगरसेवक आल्यानंतर आंदोलनाचे रूपांतर द्वारसभेमध्ये झाले.
आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना डॉ. संगेवार यांनी कालच्या प्रकाराची माहिती सांगितली. आणि नगरसेवक कुंभार व त्यांच्या मुलाने गळपट धरून धक्काबुक्की केल्याचे स्पष्ट केले. यावर बोलताना अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार म्हणाल्या, नगरसेवक कुंभार यांनी केलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रमाणे महिला नगरसेविकांनी त्यांचे पती, मुले किंवा अन्य नातेवाईक नगरपालिकेकडे कामासाठी पाठवू नयेत. त्याचबरोबर नगरसेवकांनीही त्यांची मुले व अन्य नातेवाईक पालिकेत पाठवणे बंद करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधी तक्रार असेल तर नगरसेवक किंवा नगरसेविकांनी ती रितसरपणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नोंदवावी. कुंभार यांचे पद रद्द करण्यासाठी मुख्याधिकारी सुनील पवार यांच्याकडे आपण शिफारस करू. तातडीने त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
यावेळी कामगार नेते नौशाद जावळे, हरि माळी, संजय कांबळे, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, शंकर असगर, के. के. कांबळे, विजय राजापुरे, सुभाष मोरे, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, आदींची भाषणे झाली. शेवटी चंद्रकांत कोठावळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


नगराध्यक्ष, अतिरिक्त मुख्याधिकारींचा पाठिंबा
नगराध्यक्ष बिरंजे यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला व नगरसेवक कुंभार यांचे कृत्य चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, अन्य नगरसेवक किंवा नगरसेविकांना कृपा करून दोषी धरू नका. कुंभार यांनी केलेल्या कृत्याचा त्यांना परिणाम मिळेल.

Web Title: Employees' two-hour movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.